पान:Yugant.pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८० / युगान्त

होती. त्याप्रमाणे क्षत्रिय पुरुषच नव्हे, तर गांधारी, कुंती व द्रौपदी या क्षत्रिय स्त्रियाही वागल्या.
 जरासंधवधाबद्दल वरती आलेच आहे. कृष्णाने तो उघड्या डोळ्यांनी कर्तव्य म्हणून करवला. ह्या कृत्यात नाव ठेवण्यासारखे काहीच नव्हते. शिशुपालवध ही घटना अटळ होती. कृष्णाने रागाच्या भरात ती केली हे जितके खरे, तितकेच महाभारतकथेच्या दृष्टीने त्यावेळी ती व्हावयालाच पाहिजे होती अशी होती. पांडवांचा राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी कृष्णावर होती. त्यामुळे तो निरनिराळ्या कृत्यांत गोवला गेला होता. बोलाचाली वाढू देणे व यज्ञमंडपातच लढाई उभी करणे शक्य नव्हते. म्हणून शिशुपाल त्याच तऱ्हेने, तिथेच एकाकी, इतर राजे पुढे सरसावायच्या आत मारणे अत्यावश्यक होते. एक प्रकारे शिशुपाल गाफील होता, बोलावलेला पाहुणा होता. त्याला तशा तऱ्हेने मारणे योग्य नव्हते. पण त्यानेही पाहुणचाराच्या मर्यादा राखल्या नाहीत. आपल्या यजमानांचा, भीष्मासारख्या वृद्धाचा अपमान करून आपल्या शत्रूवर तोंडसुख घेण्याची संधी शिशुपालाने साधली. तेव्हा कृष्णाने असहाय किंवा निरपराध मनुष्याला मारले असेही होत नाही. एकदा आगळीक करण्यास सुरवात झाली, म्हणजे त्या आगळिकीस प्रत्युत्तर जितक्यास तितके, जेवढ्यास तेवढे देता येईल, असे होत नाही. शिशुपालाने शिव्या दिल्या, नाहक अपमान केला, याचा बदला परत शिव्या देऊन घेता आला असता. त्याऐवजी कृष्णाने त्याला मारून घेतला. आता हा बदला फार झाला असे वाटणे शक्य आहे. पण राजेलोकांत भांडण लागून मोठा रक्तपात झाला असता, तो एका शिशुपालाच्या वधामुळे टळला, असेही म्हणता येईल.
 पांडव वनवासातून आल्यावर ज्या मसलती झाल्या, त्यांत कृष्णाचा वाटा मोठा होता व सर्वस्वी योग्य असाच होता. शिष्टाईच्या वेळीही त्याने भांडण मिटावे, म्हणून पराकाष्ठा केली.