पान:Yugant.pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७८ / युगान्त

आखलेल्या ध्येयांच्या भोवऱ्यात सापडलेला होता. धीट प्रकृतीचा व विचारशील असूनही त्यालाही राग, मित्रप्रेम हे विकार होतेच. ज्या वेळी तो एखादे कृत्य करी, किंवा दुसऱ्याला एखादे कृत्य करण्याला प्रवृत्त करी, त्या वेळी त्याच्यापुढे जी निवड होती, ती उत्तम किंवा अधम यांच्यामधील नसून मिश्र अशा मध्यम प्रकारच्या कृत्यांमधील होती.
 सबंध महाभारतामध्ये त्याने केलेली मुख्य कृत्ये म्हणजे अर्जुनाच्या मदतीने खांडववनाचा दाह, जरासंध वध, शिशुपाल वध, पांडवांच्या वतीने कौरवांकडे शिष्टाई, द्रौपदीची लालूच दाखवून कर्णाला फोडण्याचा प्रयत्न, भीष्माला रथावरून खाली पाडण्यासाठी अर्जुनाचे मन वळवणे, द्रोणाचे धैर्य खचवण्यासाठी अश्वत्थाम्याला मारल्याचा बभ्रा करणे ही आहेत. खांडव दाहाबद्दल मागे लिहिलेच आहे. खांडवदाह-प्रकरणी नागांचा वंशच्छेद व एक मोठे अरण्य जाळणे ही दोन्ही कृत्ये आत्ता विचार केला तर गर्ह्य वाटतात. पण कृष्णाच्या वेळेला कोणीही हे कृत्य गर्ह्य मानले नाही. कृष्णाच्या प्रत्येक कृत्याबद्दल टीका करणाऱ्या शिशुपालालाही हे कृत्य गर्ह्य वाटले नाही. परवंशाबद्दल असहिष्णुता, शक्य तर त्यांचा उच्छेद ह्या गोष्टी पूर्वी सर्व जगातील लोक सरसकट करीत होते. कृष्णाने केले, ते त्याच्या काळाला व त्याच्या क्षत्रिय वर्णाला धरून होते. ते नसते केले, तर तो, आपल्याच युगातील असामान्य व्यक्ती न राहता देशकालातीत असामान्यत्व त्याला प्राप्त झाले असते. आपल्या जमातीतील नसलेल्या अशा सर्व मानव-जातीबद्दल करुणा हा गुणच महाभारतकालीन नव्हे! त्या वेळच्या इतर सुसंस्कृत देशांनासुद्धा तो गुण माहीत नव्हता. होमरचे इलियड वाचले, तरी हेच अनुभवास येते. सबंध मानव-जातीबद्दल कणव वाटली, ती पुढील युगांतील पुरुषांना बुद्धाला व ख्रिस्ताला ! भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे, त्यातील पहिले जेमतेम तीन अध्याय मूळ