पान:Yugant.pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / १७७
 

कार्ये होत राहतात. भीष्माच्याही बाबतीत आपण हेच पाहिले. धृतराष्ट्राच्या बाबतीत व महाभारतातील प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हेच घडत गेले. 'भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया' असे हे अनाकलनीय व अटळ चक्र आहे. एकदा त्याच्यात मनुष्य सापडला की, त्याच्या कृत्याला ठराविक दिशा लागत जाते. प्रत्येक कृत्याच्या बाबतीत करू की न करू हे स्वातंत्र्य राहत नाही. एका ठरलेल्या दिशेने आयुष्याचा मार्ग जाऊ लागेल, तसेतसे हे स्वातंत्र्य कमी कमी होत जाते.

  1. आयुष्यामधील निवड खरे-खोटे, चांगले-वाईट अशा दोन टोकांमध्ये क्वचितच असते. थोडे वाईट, थोडे चांगले अशा मिश्र स्वरूपाच्या कृत्यांमधून माणसाला निवड करावी लागते. सर्व दृष्टींनी चांगले व सर्व दृष्टींनी वाईट, अशा तऱ्हेने निवड करायची संधी क्वचितच मिळते. त्यामुळे कोणचीही निवड केली, तरी थोडे वाईट येतेच. अगदी तोलून, मोजून-मापून पाहिले तर प्रत्येक व्यावहारिक कृत्यामध्ये काहीतरी दोषास्पद असतेच. त्यातूनही मोजून-मापून पाहणारा परीक्षक बहुतेककरून झाल्या-गेल्या गोष्टीबद्दल मते देत असतो. दोन किंवा तीन मार्गामधून कुठची निवड केली आणि त्याचे परिणाम काय झाले, हे त्याला दिसत असते. केलेल्या निवडीचे परिणाम काय झाले, हे ह्या मागाहून आलेल्या टीकाकाराला माहीत असतात. पण प्रत्यक्ष जी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात आणीबाणीच्या प्रसंगी दोन वाटांपैकी एक वाट टाकून दुसऱ्या वाटेने जाते, ती कितीही शहाणी व दूरदृष्टीची असली, तरी तिला संपूर्ण भविष्यज्ञान होत नाही. त्या व्यक्तीपुढे त्या प्रसंगाची, त्या क्षणाची आणीबाणी असते. त्यातच स्वतःचे क्रोध, मोह, एक प्रकारची कर्तव्यनिष्ठा, वगैरे विकार असतात. स्वतः कृष्णही ह्या दोन्ही नियमांना अपवाद नव्हता. तोही स्वतः केलेल्या कृत्यांच्या व स्वतः