पान:Yugant.pdf/191

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४ / युगान्त


 एक फार वाईट गोष्ट ह्या युद्धामुळे झाली. कृष्णाच्या संभाळून घेण्याच्या वृत्तीमुळे यादवांमधील आपापसांतील दुहीवर झाकण पडले होते. यादवांत निरनिराळे गट होते. पण कृष्णाने त्या गटांच्या स्पर्धेला व वैमनस्याला लगाम घातला होता. ह्या युद्धाच्या निमित्ताने ते गट उघडे झाले. कृष्ण व त्याच्याबरोबर सात्यकी वगैरे त्याचे मित्र पांडवांच्या बाजूला होते. कृतवर्मा व भोज दुर्योधनाच्या बाजूला होते आणि कोणाच्याच बाजूला लढणे नको म्हणून बलराम बाहेर निघून गेलेला होता. यादवांत उघड-उघड दोन तट पडले. बाहेरून दिसावयाला एकसंध असलेली यादवांची फळी या निमित्ताने भंगली. जुन्या कुरबुरीत नव्या हेव्या-दाव्यांची भर पडली आणि यादवांच्या अंताची बीजे महाभारत-युद्धात पेरली गेली. यादवांचा अंत कृष्णाला दिसला असे म्हणवत नाही, पण यादवांची दुफळी झाली, हे तर त्याच्या डोळ्यांपुढे स्पष्ट होते. याचे परिणाम काही चांगले होणार नाहीत, हे समजण्याची प्रज्ञा त्याच्याजवळ खासच होती. इतके असूनही तो लढाईला उभा राहिला, त्या वेळी गीतेमधील जो एकेक श्लोक अर्जुनाला उद्देशून म्हणत होता, तो त्याला स्वतःलाच लागू होता. तो लढाईला उभा राहिला, हा प्रसंग काही दृष्टींनी त्याच्या आयुष्यातील मोठ्या त्यागाचा क्षण ठरतो. आकांक्षा धुळीला मिळाल्या असतानाही तो मित्रांसाठी व न्यायासाठी उभा राहिला हा वेडपणा की मोठेपणा?
 महाभारतामध्ये निरनिराळ्या प्रसंगी कृष्णाने पांडवांना जो उपदेश केला, त्यात त्याची कपटनीती दिसून येते असे काहींचे म्हणणे आहे. कृष्ण हा अतिशय प्रज्ञासंपन्न आणि सदैव जागृत अशा व्यक्तींपैकी एक होता, त्या वेळच्या नीतीला धरून उघडया डोळ्यांनी तो वर्तन करीत होता. त्याला जे वर्तन अतिशय गर्छ वाटत होते, त्याचा बीमोड करण्यासाठी त्याने मोठे संकट पत्करले.