पान:Yugant.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६ / युगान्त

 ‘वासुदेव' होणे हे प्रकरण काय आहे, ह्याचा नीटसा उलगडा होत नाही. पुराणातून कृष्ण-वासुदेव हा विष्णूचा अवतार होता व अवतारकार्य करून तो गेला, अशी कथा येते. तीच कथा सर्वांना माहीत असते. कृष्ण वासुदेव आपल्या स्वतःच्या आयुष्यभर देव म्हणून वावरला. त्याने देव म्हणून चमत्कार केले व तो आपल्या काळी देव मानला गेला, हेच आपण धरून चालतो. मागाहूनचे संस्कृत लिखाण हेच सांगते. मराठीत तर पांडवप्रताप, भक्तिविजय हे ग्रंथ, रुक्मिणी-स्वयंवर, सुभद्राहरण ह्यांची रसभरित आख्याने, त्यांवर आधारलेली नाटके ही तर कृष्णाबद्दल हीच भावना दृढ रुजवतात. महाभारत वाचताना त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. कृष्ण असामान्य मानव-पण मानवच असे महाभारतात चित्रण आले त्याचे काही नवल वाटत नाही; पण ‘वासुदेव' म्हणवून घेण्याचे त्याचे प्रयत्न, दुसऱ्या काही जणांचा तोच अट्टाहास, कृष्णाला आपले ‘वासुदेवत्व' टिकवण्यासाठी त्यांना मारावे लागणे, हे उल्लेख वाचून मन बुचकळ्यात पडते.
 महाभारतात ह्या प्रकरणाचा काही उलगडा होत नाही; जैन वाङ्मयात होतो. जैनांची ‘वासुदेव' कल्पना पुढीलप्रमाणे आहे : जैनांनी कालचक्राचे चोवीस भाग कल्पिले आहेत. त्यांतील बारा भाग ‘उत्सर्पिणी (वर जाणाऱ्या) अवस्थेचे व बारा भाग'अवसर्पिणी' (खाली येणाऱ्या) अवस्थेचे धरतात. खालून वर येणाऱ्या अवस्थेत सर्व जीवमात्र जास्त-जास्त चांगल्या मूल्यांकडे जात राहतात, तर अवसर्पिणीत त्यांची अधोगती होत राहते. 'कालचक्राच्या काही काही विभागात मिळून नऊ ‘वासुदेव', नऊ ‘बलदेव' व नऊ ‘प्रतिवासुदेव' असे निर्माण झाले. अवसर्पिणीतच राम व कृष्ण असे दोन ‘वासुदेव' झाले. सर्व नऊ वासुदेवांच्या आयांची व बापांची नावे दिलेली आहेत. रामाची आई केगमई व बाप दशरथ, कृष्णाची आई देवकी व बाप वसुदेव म्हणून कृष्ण (कण्ह) हा पैतृक अर्थाने ‘वासुदेव' होता. 'वासुदेव' अखिल