कृष्णाचा पांडवांशी जो संबंध होता, त्याचा विचार करताना कृष्णाच्या सबंध आयुष्याचाच विचार करण्याची आवश्यकता आहे. भगवद्गीतेत ‘न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन' असे म्हणणाऱ्या श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये पुष्कळच कार्ये व धोरणे होती. काही कुलाविषयीची, काही त्या वेळच्या सबंध क्षत्रियवर्गाविषयीची व काही सर्वस्वी स्वतःविषयीची अशी होती. कंसवध हे काही अंशी स्वतःचे खाजगी कर्तव्य होते, तर काही अंशी सबंध कुळाचीच ती सोडवणूक होती. कंसाच्या वधामुळे कंसाच्या सासऱ्याचे म्हणजे जरासंधाचे यादवांना जे भय उत्पन्न झाले, त्यातून यादवांची मुक्तता करणे, त्याचप्रमाणे क्षणोक्षणी जागरूक राहून ह्या भांडकुदळ व द्वाड वंशाला एकत्र ठेवणे हे आणखी एक कर्तव्य होते. त्या वेळच्या क्षत्रिय रूढीला हरताळ फासून शंभर क्षत्रियांना बळी द्यायला निघालेल्या जरासंधाचा काटा काढणे हेही त्याचे कार्य होते. हे कार्य जितके स्वतःच्या कुळासाठी हाते, तितकेच ते सर्व राजवंशांची एक विशिष्ट घडी बसवण्याच्या त्याच्या प्रयत्नांचेही निदर्शक होते.
महाभारतात एक गोष्ट मनात भरते, ती म्हणजे क्षत्रियराण्यांचे एकमेकांशी संबंध व क्षत्रियांनी वागण्याचे नियम. निरनिराळ्या राजघराण्यांची वंशपरंपरागत राज्ये व राजधान्या होत्या. सिंधू, सौवीर, मद्र, गांधार, मत्स्य, पांचाल,हस्तिनापूर, खुद्द मगध, चेदी, विदर्भ या सर्व देशांचे राजे वंशपरंपरागत आलेल्या राज्यावर बसलेले होते. यादवांना मथुरेहून पळावे लागले. त्यांनी नवी राजधानी वसवली; ती दुसऱ्या कोणाचे राज्य हिसकावून घेऊन वसवली असे दिसत नाही. लढाईची वर्णने आहेत. दिग्विजयाची वर्णन आहेत, पण कोणी कोणाचे राज्य जिंकून घेतल्याचे उल्लेख नाहीत. जरासंधाला मारल्यावर जरासंधाच्या मुलाला अभय देऊन राज्यावर बसवले. जरासंधाने पकडलेल्या राजाची मुक्तता करून ज्याला-त्याला आपापल्या लहान-लहान राज्यात रहायची परवानगी दिली.
पान:Yugant.pdf/178
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १६१
