पान:Yugant.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १५३
 




नऊ



कृष्ण वासुदेव




 कृष्ण महाभारतात येतो, तो आदिपर्व संपता-संपता, द्रौपदी स्वयंवराच्या वेळी. त्याच्या आधी कृष्णाचा पांडवांशी किंवा कौरवांशी कसलाच संबंध दाखवलेला नाही. वसुदेवाची बहीण कुंती (म्हणजे कृष्णाची आत्या) पांडूने करून घेतली, एवढा एक उल्लेख येतो. त्यापलीकडे यादवांशी काही संबंध दाखवलेला नाही. पांडू मरेपर्यंत पांडव हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रानात राहत असत. पांडू मेल्यावर व माद्री सती गेल्यावर विधवा कुंती पोरक्या मुलांना घेऊन हस्तिनापूरला आली व हस्तिनापूरला राहिली. भीष्माच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण झाले. कुंतीच्या व विदुराच्या दक्षतेमुळे कौरव दरबारी त्यांचे संरक्षण झाले. पुढे त्यांना गंगेकाठच्या एका गावाला पाठवून मारायचा घाट कौरवांनी घातला. जळत्या घरातून मोठ्या युक्तीने बाहेर पडून कुंती व पाच पांडव एक वर्ष, द्रुपदाच्या राजधानीत येईपर्यंत, लपत-छपत राहिले. पांडवांनी द्रौपदीला मिळवली, तीसुद्धा आपण कोण, हा सुगावा लागू न देता. म्हणजे पांडवांच्या लहानपणी त्यांच्यावर नाना आपत्ती कोसळत असताना व अतिशय सावधगिरी बाळगावी लागत असताही कुंतीने माहेरच्या माणसांची मदत घेतली