पान:Yugant.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२ / युगान्त

उतावळेपणातही क्षुद्रपणा दिसता कामा नये,अशा तऱ्हेचा अलिखित नियम होता. कर्णाला तो पाळता आला नाही. त्याला कारण कर्णाचे विफल आयुष्य. क्षत्रियांचे कसब काही प्रमाणात त्याला साध्य झाले. पण क्षत्रियांची आचार-विचारांची, उत्तम क्षत्रियांच्या अशा मानल्या गेलेल्या आचार-विचारांची भूमिका त्याला साधली नाही. क्षत्रियांची अनौरस अवलाद म्हणून मनात एक त्वेष भरून राहिला होता. वेळोवेळी तो राग उफाळून आलेला दिसतो. क्षत्रियांची अनौरस संतती असूनही काही परिस्थितीत क्षत्रियत्व मिळण्याची शक्यता होती. पण ते कर्णाला मिळत नव्हते. ‘सूत' या वर्गाला मान्यता मिळावी किंवा क्षत्रियत्व पौरुषावर ठरावे, अशा तऱ्हेची तात्त्विक भूमिका कर्णाने घेतली नव्हती. 'दैवायत्तं कुले जन्मः मदायत्तं तु पौरुषम्' ह्या भूमिकेवरून कर्ण भांडत नव्हता. आधुनिक वर्गकलहाचे बीज ह्या झगड्यात नव्हते. कर्ण स्वतःच्या, एकट्याच्या स्थानासाठी झगडत होता. शस्त्ररंगातील त्याच्या ह्या वेळच्या धारिष्टाला फळ मिळाले नाही. त्याच्या जन्माचे रहस्य रहस्यच राहिले. आणि आपले क्षत्रियत्व सिद्ध करण्याची पराकाष्ठा करूनही ते मिळाले नाही, म्हणून त्याचा संताप अधिक झाला.
 अर्जुनाला त्याने द्वंद्वास बोलावल्यावर रंगाचे दोन भाग पडले. अर्जुनाच्या पाठीमागे धर्म-भीष्मादी उभे राहिले. कर्णाच्या पाठीमागे दुर्योधन व त्याचे भाऊ उभे राहिले. ज्याला अस्त्रे व युद्धनीती माहीत होती [द्वन्द्वयुद्धसमाचारे कुशलः सर्वधर्मवित्।] असा कृप मध्ये उभा राहिला. त्याने रीतीप्रमाणेच म्हटले, “हा अर्जुन पांडूचा मुलगा युद्धाला तयार आहे. वीरा, तुझेही नाव, कुल सांग" कर्णाला कूळ सांगता आले नाही. त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
 दुर्योधन ताबडतोब पुढे आला. लढवय्याला कुळाची अपेक्षा का, असा प्रश्न त्याने घातला. अर्जुन जर ‘अ-राजा'शी युद्ध करण्यास तयार नसला, तर कर्णाला मी अंगाचे राज्य देतो, असे म्हणून त्याने ताबडतोब तेथल्या-तेथे कर्णाला राज्याभिषेक केला.