पान:Yugant.pdf/132

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४ / युगान्त


 महाभारतकथेशी ज्यांचा संबंध आहे, ज्यांमुळे कथाभागाचा काही परिपोष झाला आहे, असे ब्राह्मण दोन. ते म्हणजे द्रोण व अश्वत्थामा हे पितापुत्र. पांडव व धार्तराष्ट्र हे लहान असताना द्रोणाचा महाभारतकथेत प्रवेश होतो. उत्तम अस्त्रविद्या माहीत असलेला हा ब्राह्मण कौरवांच्या कुलपरंपरागत गुरुचा म्हणजे कृपाचार्यांचा मेहुणा होता. हा कुठेही आश्रय न मिळालेला व त्यामुळे दारिद्याने गांजलेला असा होता. एवढेच नव्हे, तर अपमानाने तो जळत होता. पांचालांच्या राजाचा सहाध्यायी म्हणून मित्र ह्या नात्याने तो त्याच्या दरबारात गेला असताना द्रुपदाने त्याची हेटाळणी केली होती. द्रुपदाने आपल्या पदरी द्रोणाला ठेवूनही घेतले असते; पण लहानपणाचा शाळासोबती म्हणून बरोबरीच्या मित्राचे नाते द्रोण सांगू लागला, ते द्रुपदाला सहन होईना, आणि अशा अपमानाने जळत द्रोण पांचालांच्या दरबारातून कृपाकडे आला होता. आपल्या सावत्र भावाच्या नातवंडांना अस्त्रविद्या शिकवण्यासाठी भीष्माने त्याची नेमणूक केली. विद्या शिकवून झाल्यावर गुरुदक्षिणा म्हणून अर्जुनाकडून त्याने द्रुपदाचा पराभव करवला, व द्रुपदाशी बरोबरी होण्यासाठी अर्ध्या राज्याच्या मोबदल्यात द्रोणाने द्रुपदाला जिवंत सोडले. एखाद्याचा पराभव करून त्याचा प्रदेश हिसकावून त्या प्रदेशाचा राजा होणे ही गोष्ट त्या वेळच्या नीतीला धरून नव्हती. त्यातूनही हे एका ब्राह्मणाने करणे योग्य नव्हते. द्रुपदाचा पराभव झाला व अर्जुनाने त्याला बांधून आणले. जुन्या गोष्टीची ओळख देऊन द्रोणाने त्याला सोडून दिले असते. म्हणजे अपमानाची भरपाई करून घेतल्यासारखे झाले असते, व शांती आणि मनाचा मोठेपणा सिद्ध झाला असता. तसे न करता उत्तरपांचाल म्हणजेच अहिच्छत्र द्रोणाने आपल्याकडे ठेवला. दक्षिणपांचालात द्रुपद राजा राहिला. उत्तरपांचाल बळकावूनही द्रोण कौरवांच्या राजसभेतच राहिला होता असे दिसते.