पान:Yugant.pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०८ / युगान्त

दिली. गंगे-यमुनेकाठी राहणाऱ्या कोणत्याही क्षत्रियाची इतकी सुंदर सभा नव्हती. आर्यांची सगळी बांधणी लाकडाची असे. याउलट आर्यांच्या आधी भारतात असलेल्या लोकांनी भाजलेल्या विटांनी मोठमोठी शहरे बांधली होती. असुर नावाचे लोक तर बांधकामात फारच प्रवीण होते. नुसत्या साध्या विटा नव्हेत, तर काचेचा थर बसवलेल्या निरनिराळ्या रंगांच्या विटाही ते बनवीत असत. त्याच विटा वापरून मयाने पांडवांची सभा बांधलेली असणार. हिरवट निळ्या विटांनी त्याने पाण्याचा भास निर्माण केला. पाणी खेळवलं, त्याच्या खाली निराळ्याच रंगाच्या विटा वापरून जमिनीचा भास निर्माण केला. ह्या सभेत पुष्कळांची खूप फजिती झालेली असणार: पण महाभारतात वर्णन आहे, ते फक्त दुर्योधनाच्या फजितीचे आणि त्याला मोठमोठ्याने हसणाऱ्या द्रौपदीचे व भीमाचे! आधीच पांडवांच्या वैभवाने जळणाऱ्या दुर्योधनाला हे हसणे जिव्हारी भिडले असल्यास नवल नाही. इकडे भीम व द्रौपदी हसत होती, तिकडे धर्माने त्याला हात धरून उठवून नवी वस्त्रे नेसावयास दिली. हा प्रकार त्याला सिद्ध-साधकपणाचाच वाटला असला पाहिजे. एकाने उपहासाने मारावे, दुसन्याने औदार्याने मारावे! दुर्योधन संतापाने व इर्षेने इतका जळला की, पांडवांचा नक्षा उतरवण्याकडे त्याचे सारखे लक्ष लागले, ते साध्य झाले नाही. तर तो जीव देण्यास निघाला होता. शेवटी त्याच्या मामाने पांडवांना द्यूतात हरवून देशोधडीला लावले, व भाच्याचे हृदय शांत केले.
 रान जाळून आतील प्राण्यांचा एवढा अमानुष संहार करून सभा मिळवली, तिचा उपभोग पांडवांना पुरती पाच-दहा वर्षेसुद्धा मिळाला नाही.
 पांडव वनवासात होते, तेव्हा इन्द्रप्रस्थाची किंवा मयसभेचा काही पडझड झाल्याचा उल्लेख नाही. पण पांडवांनी युद्धोत्तर राज्य केले ते हस्तिनापुरातच. वज्र किती वर्षे इन्द्रप्रस्थात टिकला, त्याच्यामागून त्याचे वंशज तेथे राहिले का, वगैरे काहीच उल्लेख