पान:Yugant.pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०६ / युगान्त

म्हणून जेव्हा एका जमातीने इतरांवर मात केली, तेव्हा शक्यतो त्यांचा निःपात करण्याचे धोरण तिने पत्करले.
 खांडववनात ज्यांची कत्तल झाली, त्यांपैकी मुख्य होते तक्षकनागाचे घराणे. तक्षक कुरुक्षेत्राला गेला होता, म्हणून वाचला. पण त्याची बायको व इतर परिवार जळाला. ह्या तक्षकाच्या निमित्ताने महाभारतात गुंफलेली एक उपकथा आपल्याला सापडते. खरोखर ही उपकथा नसून महाभारताच्या मुख्य कथेइतकीच महत्त्वाची व तीन पिढ्यांचा इतिहास व दोन मानववंशांचा झगडा सांगणारी एक जोडकथा आहे. महाभारताच्या सुरवातीलाच ही कथा येऊन जाते. कर्णपर्वात हीतील एक प्रसंग येतो. पण एकदा आदिपर्वात तिचा विस्तार झाल्यावर महाभारताच्या कथानकात ती डोकावत नाही. उत्तंकाच्या कथेत असा उल्लेख आढळतो की, तक्षक कुरुक्षेत्री इक्षुमती नदीच्या काठी राहत होता. खांडवदाह प्रकरणात आपल्याला कळते की, खांडववन हे तक्षकाचे राहण्याचे अरण्य होते. इक्षुमती ही यमुनेला मिळणारी एखादी लहान नदी असावी. खांडववनात तक्षक तर मेला नाहीच, पण त्याचा निर्वंशही झाला नाही. पण ह्या प्रयत्नामुळे नुसते तक्षकाचेच नव्हे, तर एकंदर 'नाग' नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांचे व पांडववंशाचे वैर जडले. हे वैर अर्जुन, अर्जुनाचा नातू परीक्षित व परीक्षिताचा मुलगा जनमेजय असे तीन पिढ्या टिकले. कृष्णार्जुन युद्धाच्या वेळी तक्षकाच्या मुलाने अर्जुनाला मारण्याचा निकराचा प्रयत्न केला, तो साधला नाही. पण अर्जनाचा नातू परीक्षित ह्याला तक्षकाने मारले. त्याचा सूड परत एकदा सर्पसत्राच्या निमित्ताने भयंकर हत्या करून जनमेजयाने घेतला.
 हे 'नाग' नावाचे लोक काही त्या वेळच्या क्षत्रियांच्या दृष्टीने परके नव्हते व जंगली नव्हते. कुरूंची जी वंशावळ सांगितली आहे, तीत निरनिराळ्या दोन राजांनी तक्षकाच्या 'ज्वाला' नावाच्या मुलींंशी लग्न केल्याची नोंद आहे, व ह्या दोन ज्वालांची मुले राज्यावर बसली, असाही उल्लेख आहे. म्हणजे कुरुवंशात-निदान शंतनुपर्यंत