पान:Yugant.pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९८ / युगान्त

पांडवांना मारायचा घाट घातला होता, पण तो फुकट जाऊन ते नव्या जोमाने प्रकट झाले. अशा वेळी त्यांना राज्याचा वाटा देणे धृतराष्ट्राला भाग पडले. त्याने धर्माला बोलावून त्याला एक वाटा दिला व खांडवप्रस्थाला जाऊन रहा म्हणून सांगितले. वंशपरंपरा आलेली कुरूंची राजधानी धर्माला मिळाली नाही. राज्याच्या एका सीमेवर मोठ्या अरण्याशेजारी वसलेले एक गाव त्याच्या वाट्याच्या हिश्श्यात त्याला मिळाले. तोवर खांडवप्रस्थाचे नावही महाभारतात आलेले नाही. खांडवप्रस्थाला गेल्यावर धर्माने त्या लहानशा गावाचे राजधानीत रूपांतर करावयास प्रारंभ केला. निरनिराळे उद्योगधंदे करणारे लोक येऊन तेथे स्थायिक झाले. श्रीमंत व्यापारी तेथे येऊन राहिले. धर्माने निरनिराळ्या हरहुन्नरी लोकांना आग्रहाने आणून वसवले. धर्माने खांडवप्रस्थाचे राजधानीत रूपांतर केले. पण ही राजधानी नवीनच म्हणून हस्तिनापूरच्या मानाने लहानच असणार. ह्या खांडवप्रस्थाचेच ‘इन्द्रप्रस्थ' असेही दुसरे नाव वारंवार येते. तेथेच नारदाने घालून दिलेल्या नियमाचा भंग झाल्यामुळे अर्जुनाला वनवासास जावे लागले. वनवासात असतानाच त्याचे सुभद्रेशी लग्न झाले. वनवास संपवून तो इन्द्रप्रस्थाला परत आला व यादव हे सुभद्रा आणि खूप संपत्ती, दास-दासी, रथ-घोडे वगैरे आंदण बरोबर घेऊन मोठ्या लवाजम्यानिशी मागोमाग आले. राजधानीत कित्येक दिवस मोठा उत्सव झाला. दिवस उन्हाळ्याचे होते. अशावेळी अर्जुनाने मनात आणले की, वनविहाराला जावे. एका दिवसाचा वनभोजनाचा बेत झाला. धर्माची परवानगी घेऊन वडील मंडळींना न घेता कृष्णार्जुन वनविहाराला गेले. त्यांच्या बायका व दासदासी ह्याखेरीज इतर मंडळी नव्हती. सर्वांनी खूप खाल्ले, खूप दारू प्याली. बायका कोणी नाचत होत्या, कोणी गात होत्या, वृक्षांच्या दाट सावलीने ऊन मुळीच भासले नाही. कुष्णार्जुनांनी एकत्र बसून पुष्कळ गप्पा मारल्या. एकमेकांना युद्धातील व प्रेमातील पराक्रम (विक्रान्तानि रतानि च) ऐकवले, ते असे बसले असताना एक ब्राह्मण त्यांच्याकडे आला व म्हणाला, “मी भुकेला आहे. मी खूप खाणारा आहे. नेहमी