पान:Yugant.pdf/114

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / ९५
 


मन कधीच पूर्ण मारता येत नाही. कृती समतोल ठेवता येते. पण मनातून पाचांवर अगदी मापून सारखे प्रेम करणे शक्य होते का? अर्जुनावर जास्त प्रेम केले, तर त्यात नवल काय?
 मन क्षणभर थांबले... प्रेम केले, म्हणजे काय? जन्मभर त्याच्यासाठी झुरले हेच ना? पण माझ्या प्रेमाला कधी प्रतिसाद मिळाला होता का? उलुपी, चित्रांगदा, सुभद्रा-अर्जुनाने किती स्त्रियांवर प्रेम केले!... हे तरी खरे का? अर्जनाने कोणा तरी स्त्रीला आपले हृदय दिले होते का? स्त्रियांनी अर्जुनावर प्रेम केले, पण अर्जुनाचे हृदय कृष्णाला दिलेले होते. अगदी पूर्वीपासून. इंद्रप्रस्थ वसवण्याच्या आधीपासून तिला माहीत होते की, अर्जुन आणि कृष्ण घटका घटका बोलत बसायचे. त्यांच्या बोलण्यात कधी एखादी नवीन कल्पना-शहर वसवण्याची-असेलही, पण ते बोलत ते मित्र ह्या नात्याने. एकमेकांचे हृद्गत एकमेकांना सांगण्यासाठी, एकमेकांचे शब्द ऐकण्यासाठी. अर्जनाचे मन कोणीही बाई जिंकू शकली नाही. प्रतिसाद न मिळताही मी कुणासाठी तरी झुरावे, कोणीतरी माझ्यासाठी जीव टाकावा... एकदम धक्का बसल्यासारखे मन थांबले. ज्याने जन्मभर द्रौपदीसाठी जीव टाकला. त्याच्या प्रेमाची जाणीव वीज लखलखावी, तशी अंत:करणात घुसली. द्रौपदीने नव्या जाणिवेचा निःश्वास टाकला. निराळीच चित्रे डोळ्यांपुढे आली. स्वयंवर मंडपाच्या बाहेर अर्जुनाच्या बरोबरीने शत्रूशी लढाई करणारा भीम, सभेमध्ये द्रौपदीला आणली, तेव्हा थोरल्या भावाचे हात जाळायला निघालेला भीम, संताप आवरेनासा झाल्यामुळे अर्जुनाने हात धरून ठेवलेला भीम, द्रौपदी दमली की कळवळणारा भीम, द्रौपदीसाठी सुवासिक कमळे आणायला धावलेला भीम,दुःशासनाचे रक्त पिणारा भीम,रक्ताने माखलेल्या हातांनी द्रौपदीची वेणी घालणारा भीम,कीचकाचा वध करणे अर्जुनालाही शक्य होते,पण ते काम करणारा भीमच.एक-ना-दोन किती गोष्टी आठवाव्या?