पान:Yugant.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / ८१
 


पुरे करण्यासाठी त्याने वनवास पत्करला. पांडवांचा वनवास मात्र अटळ होता. कौरवांच्या-शत्रूंंच्या-राजधानीत, वडीलधाऱ्या माणसांसमोर उघड-उघड पण झाला होता, त्याप्रमाणे वागण्याखेरीज गत्यंतर नव्हते. वनवासाच्या आरंभी द्रुपदाचा मुलगा व कृष्ण पांडवांना भेटण्यास आले होते. तेव्हाही झालेल्या गोष्टींबद्दल हळहळ व्यक्त करण्याखेरीज त्यांना काही करता येत नव्हते. त्या वेळी युद्धाला उभे राहणे म्हणजे यशाला कायमचा डाग लागला असता, व कदाचित मित्रही मिळाले नसते. सत्यप्रतिज्ञ राहणे हे वर्तन नुसते ध्येयपूर्णच नव्हे तर शंभर टक्के व्यावहारिकही होते.
 पांडवांना राज्य मिळण्याला जशी द्रौपदी थोडीफार कारण झाली, त्याचप्रमाणे त्यांचे राज्य घालवण्यातही तिचा वाटा होता. त्यांचा वनवास तो तिचाही वनवास होता. केवळ त्यांची सावली म्हणून ती त्यांच्याबरोबर वनवासात गेली, असे नव्हे. नवऱ्यांचे वैभव व मोठेपणा भोगायचा तिचा अधिकार, तशीच त्यांच्या कष्टांची व अपमानाचीही तीच वाटेकरीण होती. पांडवांच्या इतर बायका आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेल्या. द्रौपदीने फक्त आपली मुले माहेरी पाठविली. त्यांचे सर्व शिक्षण व्हावयाचे होते. त्यांना रानात बरोबर ठेवून चालणार नव्हते. ती किती यातना भोगीत होती, ह्याचे वर्णन अधून-मधून येते. झाले गेले बिनबोलता भोगले, हा तिचा धर्मच नव्हता. तिने कडकड बोटे मोडली, शिव्याशाप दिले. ती संतापाने जळली. धृष्टद्युम्न व कृष्ण वनवासात भेटायला आले, तेव्हा अविरत वाहणारे अश्र पुशीत-पुशीत त्वेषाने ती म्हणाली, "मला मुळी नवरे, मुलगे, भाऊ, बाप नाहीतच. असते तर माझा असा अपमान त्यांनी सहन केला असता का?" एवढ्यावरच ती थांबली नाही. सर्व माणसे निघून गेल्यावर पुन्हा तोच विषय काढून कौरवांचे उट्टे फेडण्यास धर्मराजाचे मन वळविण्याचा तिने प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. बरे, वनवासात असल्यामुळे गृहिणीपदाच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या म्हणावे, तर तेही नाही.