पान:Yugant.pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बारा / युगान्त


भाषाशास्त्र, प्रागैतिहासिकशास्त्र ही माहीत असणाऱ्यांना महाभारतातील व्यक्तींवर व प्रसंगांवर निरनिराळ्या तऱ्हांनी लिहिता येईल. मी लिहिले, ते माझ्या कुवतीप्रमाणे व आवडीसाठी. काही गोष्टींचा नुसता उल्लेख केला आहे. (उदा. 'आज्य' म्हणजे काय असावे; ‘घृत' म्हणजे काय असावे.) पण त्या गोष्टींवरती मी संशोधन केलेले नाही हे लिहिण्याचे कारण कोणीतरी तरुण वाचक कदाचित ह्या असल्या संशोधनात रस घेऊन त्याच्या मागे लागेल, व माझ्या चित्रणांत ज्या उणिवा आहेत, त्या भरून काढील हे.

 ‘गांधारी' हा लेख प्रसिद्ध झाल्यावर एका तरुण हिंदी मित्राने विचारले, 'ही गांधारी कोण होती बुवा?' मला अतिशय वाईट वाटले. आपण ह्या युगात निरुपयोगी,उगीचच भूतकाळात वावरणारी अशी एक अडगळ आहोत, असे वाटले. पुढे काहीच लिहू नये, असेही उद्वेगाच्या भरात वाटले. किंवा इंग्रजी आवृत्तीत लिहिल्याप्रमाणे महाभारताची सबंध गोष्टच प्रस्तावनेत लिहावी, असेही मनात आले. पण हे दोन्ही मार्ग विचारांती सोडून दिले. मी अतिशय हट्टी आहे. तरुण पिढी आपले म्हणणे माझ्या गळी उतरवण्याचा प्रयत्न सारखा करीत असते. तीन अत्याधुनिक मुले व पी-एच.डी.चे तरुण विद्यार्थी ह्यांच्या हल्ल्याला मी सारखी तोड देत असते. माझे म्हणणे ह्या पिढीच्या गळी उतरवण्याचाच हा एक प्रयत्न आहे. माझे विवेचन चुकले असे वाटून ह्या पिढीने महाभारत वाचले, तरी मी जिंकले, असे मला वाटेल.

 महाभारताची संशोधित आवृत्ती म्हणजे काय, संशोधन कसले झाले, पन्नास वर्षे खपून काढलेल्या ह्या आवृत्तीवर माझे लेख आधारलेले आहेत असे मी म्हणते, मग अमका भाग मागाहून घुसलेला, अमका प्रक्षिप्त असे मला वाटते, असे मी कसे म्हणू शकते, इत्यादी प्रश्न राहतातच. हा रुक्ष वृत्तांत प्रस्तावनेत मी