पान:Sanskruti1 cropped.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राज्य, व मालमत्ता व सर्व बायका मुलाला मिळतात. ज्यांना बायका हव्या असतील, त्यांना द्रव्याच्या मोबदल्यात ह्या बायका मिळू शकतात. म्हणजे . परद्रव्य व परदाराहरण यांविषयीचे नियमही समाजघटनासापेक्ष आहेत. विशेष मौल्यवान नीतिनियम असे त्यांना म्हणता येणार नाही.
 "म्हणजे, सर्वत्र लागू पडतील, असे नीतिनियम किंवा असा धर्म नाहीच का?"
 - बघू या आहेत का. पण आपण त्याचा विचार करण्याआधी, ते सापडले आहेत, असा ज्यांचा दावा आहे, त्यांचे काय म्हणणे आहे, ते पाहू.
 ह्यांपैकी दोन सांप्रदायिक आहेत: एक ख्रिस्तानुयायी व दुसरे महंमदानुयायी. ह्यांचे म्हणणे असे की, खुद्द देवाचा प्रतिनिधी येऊन त्याने आम्हाला सद्धर्म सांगितला, व त्याचा प्रसार करावयाची आज्ञा दिली. प्रत्यक्ष देवाने धर्म दिला, असा दावा जगातील पुष्कळच समाजांचा आहे. हामुराबीला सूर्यदेवाने कायदे दिले, अशी कथा आहे. अर्जुनाला प्रत्यक्ष देवाने गीता सांगितली, असा हिंदूंचा समज आहे. ह्यांतले खरे कोण ? अंतिम उच्चतम धर्म कोणता? 'माझ्याकडे या, मी तुम्हांला तारून नेईन,' अशा अर्थाची वाक्ये बायबलमध्ये. कुराणात व गीतेत आहेत, त्यांचा अर्थ लाविताना ख्रिस्ती व महंमदी लोकांनी 'सांगणारा मी' जो एक विशिष्ट देव त्याच्याकडे या, दुसऱ्या देवांकडे जाऊ नका, असा अर्थ केला; तर गीतेमध्ये जेथे जेथे 'माझ्यावर विश्वास ठेव ( श्रद्धावान्), माझे स्मरण कर (मय्यर्पितमनोबुद्धिः), माझ्या मागून ये ( मम वर्त्मानुर्तन्ते)', अशी वाक्ये आहेत, तेथील 'मी' विशिष्ट देवतेबद्दल नसून सर्वसामान्यपणे दैवी शक्तीला लाविलेले आहेत, असा अर्थ सर्व टीकाकारांनी व जनतेने केला. कृष्ण सांगताना 'कृष्णाचीच पूजा कर, इतरांचा तिरस्कार कर', असे कोठेही सांगत नाही; इतकेच नाही, तर देवाचे रूप भक्ताच्या आर्तीवर अवलंबून आहे, असेही सांगतो. तेव्हा देवाने फक्त जगातील एका जमातीलाच अंतिम धर्म दाखविला, हा दावा टिकून राहत नाही. प्रत्येक जमातीने आपली दैवते निर्माण केली. काहींनी आपले तेच दैवत, इतर नव्हेतच, असा हट्ट धरिला; तर बहुतेकांनी इतरांच्या दैवतांचे

।। संस्कृती ।।

९५