पान:Sanskruti1 cropped.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे; तिच्यावर सत्ता गाजविणे म्हणजे तिला बाळगणे, टाकणे किंवा मारणे हे सर्व तिच्या स्वामीला करता येते. ज्या कारणासाठी परद्रव्यहरण करावयाचे नाही, त्याच कारणासाठी परदाराहरण करावयाचे नाही. दुस-याच्या मालकी हक्कावर गदा आणावयाची नाही; कारण अशा तऱ्हेच्या अतिक्रमणामुळे वैर व वैरांतून अंतर्गत यादवी माजून संघाचा नाश होईल. परदाराहरण करू नये; पण कुमारिकेच्या किंवा विधवेच्या हरणाबद्दल काही विशेष निषेध नाही. ह्याची दोन उत्तम उदाहरणे आहेत. एक बौद्धवाङ्मयात व एक आपल्या इतिहासात. बौद्धवाङ्मयाची कथा 'दीघा जागरतो रत्ति, दीघं संतस्स योजनं । दीघो बालानं संसारो...।।' ह्या श्लोकाच्या अनुषंगाने लिहिलेली आहे. काशीच्या राजाला नगरप्रदक्षिणेच्या वेळी एक रूपवती स्त्री दिसली; व तिच्यावर त्याचे मन बसले. राजवाड्यात आल्यावर त्याने आपल्या प्रधानाकरवी त्या स्त्रीबद्दल चौकशी केली- ती स्त्री' अस्सामिका वा सस्सामिका' आहे ह्याची, म्हणजे त्या स्त्रीला स्वामी (नवरा) आहे का नाही त्याची. ती जर अस्सामिका असती, तर राजाने तिला ताबडतोब अंतःपुरात आणिले असते. पण दुर्दैवाने ती लग्नाची बायको निघाली व मग तिचे हरण करण्याआधी राजाला तिच्या गरीब कामकरी नवऱ्याला मारण्याविषयी क्लृप्त्या योजाव्या लागल्या पण त्या सिद्धीस गेल्या नाहीत, व राजाला बुद्धाच्या उपदेशाने उपरती झाली. अशी कथा आहे. दुसरे उदाहरण मोगल राजा जहांगीरचे आहे. जहांगीर युवराज असताना त्याचे एका मुलीवर प्रेम जडले. पण अकबराने तिचे लग्न एका सरदाराशी लाविले. जहांगीर बादशहा झाल्यावर त्याने मलेरियापीडित बंगाल प्रांतात त्या सरदाराची नेमणूक केली. तो सरदार मारला गेला किंवा मेला; व मग जहांगिराने या विधवेशी लग्न करुन तिला पट्टराणी केले. तीच पुढे नूरजहान या नावाने प्रसिद्ध पावली. दोन्ही गोष्टींत सुंदर स्त्रीचा अभिलाष प्रत्यक्ष राजा असूनही नवऱ्याच्या जिवंतपणी त्याला तिचा अपहार राजरोसपणे करिता येईना. दारा ही मालमत्ता असल्यामुळे मालमत्तेचे सर्व नियम तिला लागू पडत. आफ्रिकेमध्ये बहुपत्नीत्वाची चाल आहे. एखादा राजा मेला, तर त्याचे


९४

।। संस्कृती ।।