पान:Sanskruti1 cropped.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काढिते. ते तोपर्यंत जिवंत असले, तर त्याला प्यायला घेते; नाही तर खड्डा करुन पुरुन टाकते. अशा परिस्थितीत अपत्यप्रेमाची कसोटी आईला लावणे शक्य आहे का? हे स्त्रीपुरुष क्रूर मुळीच नाहीत. कष्टमय जीवनात जी मुले तग धरितात, त्यांचे संगोपन होते. आई बाप त्याला क्वचितच रागावतात किंवा मारतात. एकत्र - कुटुंबपद्धतीत आपल्याच मुलाचे लाड करणे योग्य ठरत नाही. पण काही परिस्थितीत मुलाकडे लक्ष पुरविणे शक्यच होत नाही. अपत्यप्रेम सगळ्याच आयांना असते; पण पूर्ण अविष्कार काही समाजपद्धतीतच शक्य होतो.
 स्त्रीच्या अपत्यप्रेमापायी सबंध समाज मरण्याची शक्यता असेल, तर स्त्रीने अपत्याची उपेक्षा करावी, अशी समाजाची अपेक्षा असते; व स्त्रीही त्या अपेक्षेप्रमाणे वर्तन करते.
 परदारा व परद्रव्य यांचा अपहार करू नये, हेही नियम बहुतेक समाजांत सांगितलेले असतात; पण त्याही बाबतीत काही समाजांचे धर्म अपवादात्मक दिसतात. काही समाजांत पाहुण्याला एकदोन रात्रींसाठी स्वस्त्री देण्याची रीत आहे. परद्रव्याच्या अपहाराची पद्धत तर फारच मजेदार असते. सर्व मानवसमाजांची कमीत कमी देऊन जास्तीत जास्त मिळविण्याची धडपड चाललेली असते. चारही दिशांना सैन्य पाठवून, सर्व राजांचा पराभव करून, त्यांच्याकडून लुटून आणलेल्या द्रव्याने राजसूय यज्ञ करुन, सर्व द्रव्य दान - देऊन मोठेपणा मिळवायचा प्रघात सर्वांना ठाऊकच आहे. तोच प्रकार थोड्याबहुत प्रमाणात सर्व मानवसमाजांत चाललेला दिसून येतो. जबर व्याजाने पैसे लावून व्याज न मिळाल्यास घरजमिनींवर जप्ती आणून द्रव्यसंचय करावयाचा, मग सहस्त्रभोजन घालावयाचे, कुरुक्षेत्रावर घाट बांधावयाचा, किंवा एखाद्या अनाथालयाला पैसे देऊन स्वतःचे नाव करावयाचे, हा प्रकार सर्वत्र चालतोच. परद्रव्याचे हरण करावयाचे काही मार्ग समाजसंमत असतात, काही नसतात, एवढेच. परदारेबद्दलही हाच प्रकार दिसतो. स्त्रियांबद्दलही जे-जे नियम आहेत, त्यांत एक गोष्ट लक्षात ठेवावयास पाहिजे: स्त्री ही एक मालकीची वस्तू आहे; तिला मिळवणे हा एक पुरुषार्थ

।। संस्कृती ।।

९३