पान:Sanskruti1 cropped.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बक्षीस देतात; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कार्य म्हणजे वाईट समजल्या जाणाऱ्या आचरणाबद्दल शिक्षा करितात. काही समाज एकसंध असतात; व सामाजिक नियम सोपे व सर्वांना लागू पडणारे असतात. पण आपण ज्या समाजात राहतो, त्यांची घडण अति गुंतागुंतीची आहे; व त्याच्या पोटात लहानलहान समूह असतात, त्यांचे संघर्ष चाललेले असतात, व सामाजिक नियमही सर्व समाजाला लागू पडणारे नसतात. हल्लीच्या काळात कित्येक सांप्रदायिक संघ वा राजकीय संघ फार मोठे झाले आहेत. पण त्यामुळे सामाजिक मूल्यांमध्ये एकवाक्यता येण्याऐवजी संघर्ष वाढतच चाललेला आहे.
 सामाजिक नियमानुसार वागण्याने काय मिळते ? मनुष्याच्या शारीरिक गरजा विशिष्ट नियमांप्रमाणे वागून भागतात, व दुसऱ्या सांस्कृतिक स्वरूपाच्या गरजा उत्पन्न झालेल्या असतात, त्याही भागतात, ही धर्माप्रमाणे वागण्याची फलनिष्पत्ती. अशा तऱ्हेने वागून कोणाचे हित होते? समाजाचे? व्यक्तीचे ? व्यक्तीचे हित डावलून समाजाचे हित करिता येणे शक्य नाही. समाज म्हणजे कोणी सजीव, व्यक्तीच्या पलीकडे असलेली, विराट व्यक्ती नव्हे; तर सर्व लहानलहान व्यक्ती मिळून बनलेली एक ऐतिहासिक घटना आहे. समाजाच्या नावाने व्यक्तींना पिढ्यानपिढ्या दुःखात व दारिद्र्यात ठेवणे हे शास्त्रशुद्ध नाही, येथपर्यंत आपण येऊन ठेपलो. धर्माचे स्वरूप काय? तो अंतिम श्रेष्ठतम असे एकच मूल्य असू शकते का? सारख्या मोलाची अनेक शाश्वत म्हणजे सार्वजनिक व सार्वकालिक व सार्वदेशिक असू शकतो का ? मूल्ये एकत्र नांदू शकतात का? हे प्रश्न अजून आपल्या पुढे आहेतच. धर्म म्हणजे आचारविचाराचे समाजाने ठरवून दिलेले नियम. ह्या नियमांवरच सामाजिक मूल्ये आधारलेली असतात. प्रत्येक समाज हा एक लहान किंवा मोठा संघ असतो; व सामाजिक नियम संघांतर्गत व्यक्तीसाठी जे असतात, ते संघाबाहेरच्या व्यक्तींना लागू पडत नाहीत.
 "हे तुम्ही रानटी अवस्थेतील लोकांबद्दल सांगत आहा ना?"
 नाही. हा प्रकार अगदी प्राचीन काळापासून आजतागायत चालू आहे.

९०

।। संस्कृती ।।