पान:Sanskruti1 cropped.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे काही तरी खरोखरीचे अस्तित्वात असते, असे वाटू लागते. पाश्चात्य पंडितांत ह्यावर पुष्कळ ऊहापोह झालेला आहे. आपल्याकडील तत्त्वविषयक लिखाणात अशी समजूत उत्पन्न व्हावी, असे काही नाही. पण 'समाज' हा शब्द आपण इतक्या वेळा वापरात आणतो व समाजहिताविषयी इतक्या गोष्टी करितो की, समाज म्हणजे त्यातील व्यक्तींपेक्षा काही निराळाच इंद्रियगम्य सजीव पदार्थ आहे, असे वाटू लागते. काही दृष्टींनी आणि तेसुद्धा केवळ कल्पनेत समाजाला अस्तित्व असते. हिंदू व्यक्ती प्रत्यही मरत असतात, नव्या जन्मतात; पण 'हिंदू समाज' म्हणून काहीतरी शतकानुशतके अस्तित्वात आहे. तीच गोष्ट मानव समाजाची. प्राणिजातीच्या बाबतीत असेच असते. विशिष्ट काळी व स्थळी जिवंत असलेली वाघ सिंह, हरणे, ससे मरत असतात; पण वाघ, सिंह, हरीण, ससा ही प्राण्यांची 'जात' जिवंत असते. ज्या वेळी सर्व व्यक्ती मरतात, तेव्हा जातही मरते. येथेही एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, केवळ प्राणिशास्त्रदृष्टया प्राणिजात व त्यातील प्रत्येक प्राणी ह्यांचे नाते केवळ नैसर्गिक, शारीरिक स्वरूपाचे आहे. तर समाज व त्यातील व्यक्ती ह्यांचे नाते सांस्कृतिक व सामाजिक आहे. एका प्रकारचे सर्व प्राणी मेले की त्या तऱ्हेची प्राणिजातही मरते. पण व्यक्ती न मरताही एखादा विशिष्ट समाज मरुन जातो. उदा. न्यूझीलंडमध्ये पूर्वीच्या मावरी संस्कृतीच्या लोकांचे वंशज आजही भरभराटीत आहेत; पण पूर्वीचा धर्म, संस्कृती, इतिहास सर्व नाहीसा झाला आहे. म्हणजे मावरी समाज व संस्कृती मेली; पण मावरी माणसे जिवंत आहेत. समाज व व्यक्ती ह्यांचे नाते अतिशय गुंतागुतींचे आहे. समाजाशिवाय व्यक्ती घडत नाही, जिवंत राहू शकत नाही, हे जरी खरे असले, तरी समाजाचे हित म्हणजे समाजातील व्यक्तींच्या हितापेक्षा काही निराळेच असू शकते, ही कल्पना बरोबर नाही. समाजहिताच्या नावाखाली व्यक्तींना अर्धपोटी ठेवावयाचे, शेकडो व्यक्तींना ठार मारावयाचे, कित्येकांना वेठीला जुंपावयाचे, कित्येकांना हद्दपार करावयाचे असले प्रकार आज चाललेले दिसतात. समाजाच्या अंतिम हितासाठी व्यक्तींना बळी देणे अपरिहार्य आहे, अशी भूमिका कित्येक

८८

।। संस्कृती ।।