पान:Sanskruti1 cropped.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंपरेने ठरलेले असते. सबंध समाज कित्येक आचारविचार सोडून देतो; पण जुनी दैवते - म्हणजेच त्यांचे मानवी प्रतिनिधी- मात्र जुन्या आहाराप्रमाणेच जुन्या मूल्यांना अथवा पापपुण्याच्या जुन्या कल्पनांना चिकटून बसलेली असतात. खरे म्हणजे दैवी शिक्षा वा बक्षीस ही कल्पना मानवनिर्मित व समाजसापेक्ष आणि संस्कृतिसापेक्षच आहे. पण सामाजिक शासनसंस्थांपेक्षा दैवी शासनसंस्थेची मानवी घडण जरा निराळी व स्वतंत्र असते. पुष्कळदा दैवी शासनसंस्थेवरची मनुष्याची श्रद्धा इतकी बळकट असते की, त्या श्रद्धेमुळे आचाराचे नियंत्रण होऊ शकते.
 ज्यावेळी अमकी कृत्ये वाईट व त्याज्य व अमकी चांगली व करणीय असे समाज ठरवितो व चांगली कृत्ये केली की 'हित' वा 'कल्याण' होते व वाईट केल्यास ‘अकल्याण' होते, असे आपण म्हणतो, त्या वेळी त्या संदर्भात 'अकल्याण' वा 'कल्याण' कोणाचे होते, हे पाहणे आवश्यक आहे. 'समाजाचे हित' व 'व्यक्तीचे हित' असे दोन शब्दप्रयोग नेहमी ऐकण्यात येतात. पुष्कळदा व्यक्ती व समाज ह्यांचे हितसंबंध परस्परपूरक नसून परस्परमारक असतात. बऱ्याच जणांचे श्रम घेऊन, त्यांना अर्धपोटी ठेवून एखादा मनुष्य श्रीमंत होऊन सर्व उपभोग्य वस्तू मिळवितो, त्या वेळी एका मनुष्याचे 'हित’ अनेकांना मारक ठरते. ह्याउलट पुष्कळ लोकांचे कल्याण होण्यासाठी काही व्यक्ती नाहक अपराध नसताना बळी पडल्या, तर बहुजनांचे हित काहींना मारक ठरते. तेव्हा कोणाच्या हिताकडे दृष्टी ठेवावी, असा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मनापुढे उभा राहतो. व्यक्ती म्हणजे काय हे समजणे सोपे आहे. पण 'समाज' हा शब्द ( कर्तरि प्रयोगात) कर्त्याच्या ठिकाणी योजून जी वाक्यरचना सापडते, ती ब-याच वेळा फसवी व अनर्थकारक असते. 'समाज' शिक्षण करितो, 'समाजा'ची हानी, 'समाज' सुखी किंवा दुःखी असणे किंवा होणे ह्या व असल्या शब्दप्रयोगांमुळे समाज अशी काही विराट व्यक्ती असून तिला मन-बुद्धी वगैरे इंत, अशी कल्पना उत्पन्न होते. त्यांतूनही पाश्चात्य भाषांच्या धर्तीवर रचिलेले 'हिंदू मन, मराठी मन अशांसारखे शब्दप्रयोग नेहमी वाचले, म्हणजे समाज म्हणून विशिष्ट मनोमय, व्यक्तीमत्त्वमय

।। संस्कृती ।।

८७