पान:Sanskruti1 cropped.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांगितले आहेत, त्यांपैकी अर्थ व काम ह्यांत सर्व प्राण्यांना साधारण पण रूढ मार्गांनी मिळवावयाच्या गोष्टी असतात. मोक्ष हे साध्य बहुतांश सांस्कृतिक स्वरूपाचे आहे. धर्म खरोखर सर्व पुरुषार्थांचे साधन आहे; पण ते इतके महत्त्वाचे आहे की, ते एक साध्यच बनले आहे. बहुतेक समाजांत हीच परिस्थिती दिसते. धर्माचे 'साधन' हे स्वरूप पुष्कळदा विसरावयास होते; व मग धर्माच्या नावाखाली आचारकांडाचेच, ज्याच्या मागे मनाचा मागमूसही नाही अशा आचारकांडाचेच, साध्य म्हणून स्तोम माजते. म्हणजे धर्माप्रमाणे वागून धर्म साधतो, अर्थ व काम साधतात व मोक्ष साधतो, अशी समाजातील नियंत्यांची भूमिका आहे. ह्या सर्व गोष्टी एकत्र घेऊनच 'हित' व 'कल्याण' शब्द योजिलेले आहेत. मनुष्याला काय हवे असते, ते मिळाले म्हणजे 'कल्याण' होते, अशी कल्पना आहे. धर्ममार्गाने जर ते मिळविले नाही, तर अंती अहित होते. ज्यांमुळे 'अहित' होते त्या शक्ती दोनः एक समाजाची शासनसंस्था व दुसरी मानवी बुद्धीला आकलन न होणारी आधिदैविक शक्ती. कल्याणकारी शक्तीही समाज व दैवते अशा दुहेरी समजल्या जातात. सर्व मानवसमाजाचे नियंत्रण करणारी दैवी शक्ती आहे की नाही, हा प्रश्न जरी बाजूला ठेवला, तरी त्या दैवी शक्तीचे प्रत्येक समाजाने जे रूप केले आहे, ते संपूर्णतया त्या-त्या समाजाच्या संस्कृतीला धरून केलेले आहे, हे समजावयाला कठीण नाही.
 यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
 तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विद्ध्याम्यहम् ।।
 मानवाच्या इच्छा ज्या संस्कृतिधर्माने बांधिल्या जातात, त्याच धर्माने त्या मानवाच्या देवतामूर्ती व पूजेचे प्रकार ठरविले जातात. मनुष्य जे खातो, तेच त्याचा देवही खातो. पण संस्कृतीचे पाश इतके बळकट असतात की, एखादे विशिष्ट प्रकारचे खाणे समाजाने त्याज्य ठरविले, तरीही त्या समाजाची दैवते मात्र पुष्कळदा जुनेच खाद्य मागताना दिसतात. सर्व जुनी-नवी दैवते माणसांच्या कृत्याबद्दल बक्षीस देण्यास वा शिक्षा करण्यास तयार असतात. समाज बदलत असतो; पण बक्षिसास वा शिक्षेस काय पात्र आहे. हे मात्र

८६

।। संस्कृती ।।