पान:Sanskruti1 cropped.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साधते, 'कल्याण' साधते. पैकी 'अर्थ' व 'काम' हे शब्द एका दृष्टीने समजण्यास सोपे आहेत. अर्थ म्हणजे पैसा, द्रव्य-हातांत धरिता येईल, दृष्टीने पाहता येईल, असे काही द्रव्य. ह्यात पैसा अडका, धन-धान्य, पशू, घर, वाहने, नोकर-चाकर, सर्व काही येते. काम म्हणजे इच्छा-सर्व तऱ्हेच्या इच्छा. काम हा शब्द केवळ वैषयिक सुखालाही लावतात. एका दृष्टीने अर्थ हे कामपूर्तीचे साधन आहे; एका दृष्टीने अर्थ व काम ही जीवनाची दोन मुख्य साध्ये आहेत. शरिराचे पोषण, संरक्षण (वस्त्र व निवास), कामपूर्ती, प्रजेचे भरण व पोषण इतक्या कमीत कमी गोष्टीं तरी अर्थ व काम ह्या शब्दांत येतात. ह्या गोष्टी मनुष्य व इतर प्राणी ह्यांना सामान्य आहेत. इतर प्राणी व मनुष्य ह्यांमध्ये फरक दोन: एक म्हणजे इतर प्राण्यांप्रमाणे वरील गरजा पुरविण्याचे मनुष्याचे मार्ग निसर्गाने बांधून दिलेले नसतात. आपापल्या नैसर्गिक अवस्थेत सर्व जगभर पसरलेली अशी प्राण्यांची जात नाही. ( उंदीर मनुष्याच्या मागे जवळजवळ सर्व जगभर गेलेले आहेत.) प्रत्येक जातीचे खाणे-पिणे, नरमादींचा संयोग, अपत्यप्राप्ती वगैरे स्थलकालाप्रमाणे ठरलेले असतात. एका विशेष तऱ्हेच्या हवामानात, विशेष तऱ्हेच्या खाद्यावर राहणारे प्राणी हवामान व वनस्पती किंवा प्राणिसृष्टी बदलली की, कित्येकदा निःशेष मरून जातात. (उदा. हिमयुगातील मॅमॉथ नावाचा केसाळ हत्ती).पण मनुष्य आपली परिस्थिती आपण बनवितो व हळू हळू बऱ्याच प्रमाणात निसर्गावर मात करून निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडतो. वाघ, सिंह, हत्ती, हरणे वगैरेंचे खाद्य ठरलेले असते. पण माणूस सर्वभक्षक आहे. मनुष्याची मैथुनाची वासना सार्वकालिक आहे, मनुष्य स्वतःचे संरक्षण निरनिराळ्या तऱ्हांनी करू शकतो. अमकी- एक सर्व प्राण्यांना साधारण मूलभूत अशी गरज मनुष्य अमुक तऱ्हेनेच पुरवू शकेल, असे सांगता येत नाही. ती पुरविण्याचे त्याचे मार्ग तो ज्या समाजात ज्या काळी राहतो, त्याने ठरविलेले असतात. मनुष्य निरनिराळ्या मार्गांनी आपल्या गरजा पुरवू शकतो; पण एका वेळी एका समाजात सर्वच मार्ग प्रचलित नसतात. मनुष्य सदैव 'निवड' करीत असतो. ही 'निवड' सारासार विचार करून झालेली

८४

।। संस्कृती ।।