पान:Sanskruti1 cropped.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजा इजिप्तमध्ये होऊन गेला. त्याने त्या वेळच्या सर्व दैवतांतून आटोन नावाचा देव निवडला; व तोच एकमेव देव आहे, दुसऱ्या दैवतांची पूजा करू नये, असे ठरविले. ह्या राजाच्या कारकीर्दीत आटोन देवाचे प्रस्थ वाढले. पण त्याच्या मरणानंतर हा वेडगळ एकेश्वरी पंथ टिकू शकला नाही. त्यानंतर जवळ जवळ १३०० - १४०० वर्षांनी इजिप्तपासून जवळच असलेल्या इस्त्राइलमध्ये नव्या एकेश्वरी पंथाची स्थापना झाली. ज्यू लोक एका एकेश्वरी पंथाचेच अनुयायी होते; पण त्यांचा धर्म व त्यांचे दैवत फक्त त्यांच्यापुरतेच होते. इतरांना ते दीक्षा देत नसत. पण मध्य-आशियात प्रचलित असलेल्या दैवतांची भरपूर निंदा व हेटाळणी ज्यू लोकांच्या धर्मोपदेशकांनी पिढ्यानुपिढ्या व शतकानुशतके केली. तीच प्रथा पुढे येशूने स्थापिलेल्या ख्रिस्ती पंथाने स्वीकारली. आम्हांलाच काय ते सत्य धर्माचे दर्शन झालेले आहे, व अंधारात चाचपडणाऱ्या इतर मानवसमाजांना सत्याची ही दिव्य ज्योत दाखविली पाहिजे, असे ह्या पंथाच्या अनुयायांचे मत आहे. बरोबर असेच मत महंमद व मार्क्स ह्यांच्या अनुयायांचेही आहे. ह्या लोकांनी सामाजिक मूल्यांबद्दलचा एक नवीन विचार प्रसृत केला आहे. तो असा की, सारख्या मूल्यांच्या पण निरनिराळ्या प्रकारच्या सामाजिक रचना असणे मुळी शक्यच नाही. एकच तऱ्हेची सर्वश्रेष्ठ रचना व तिचे विशिष्ट नियम असू शकतात; आणि एकदा ती माहीत झाली की, बाकी सर्व रचनांचा नाश करणे एक कर्तव्य होऊन बसते. अंतिम मूल्ये टाकाऊ समजावी का? काही यमनियमांत मूल्यांची समता असू शकते व त्यांपैकी हे अथवा ते उचलले तरी चालते, अशा प्रकारची सांस्कृतिक लवचिकता असू शकते की नाही ? - वगैरे अतिमहत्त्वाचे प्रश्न वरील सांप्रदायिकांनी उत्पन्न केले आहेत. ते पुढे पाहू.
 निरनिराळ्या मनुष्यसमाजांत निरनिराळ्या काळी भिन्नभिन्न धर्म असतात. हे धर्म म्हणजे एक प्रकारे समाजाच्या बांधणीचे नियम असतात; व ह्या नियमांप्रमाणे समाजातील व्यक्तींनी वागावे, ही समाजाची अपेक्षा असते. तसे व्यक्तींनी का वागावे? त्यामुळे काय साधते? - व्यास म्हणतात. 'अर्थ व काम साधतात. इतर लोक म्हणतात, व्यक्तीचे व समाजाचे 'हित'

।। संस्कृती ।।

८३