पान:Sanskruti1 cropped.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "अहो, तुम्ही दर वेळा आचारधर्मांवर भर देऊन त्यांची सापेक्षता सांगता. त्यांच्या पलीकडे सर्व मोठमोठ्या संप्रदायांत सांगितलेली तत्त्वे खरे बोलावे, सर्व भूतांवर दया करावी, परस्त्री, परद्रव्य ह्यांचा अभिलाष धरू नये. सारांश 'संबंध पृथ्वी हेच आपले कुटुंब' असे मानावे, वगैरे महान व चिरंतन तत्त्वे डोळ्याआड करिता. ह्याला काय म्हणावे?"
 माझ्या मनात आता हाच मुद्दा घ्यावयाचा होता. पण आचारधर्मावर मी जो एवढा भर दिला, त्याचे कारण म्हणजे निरनिराळ्या आचारधर्मांमुळे परस्परांविषयी घृणा व द्वेष वाढतो हे, व परकीयांबद्दल शत्रुत्व वाटू लागते. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील वाद वाचले, तर ते तुम्ही वर सांगितलेल्या महान तत्त्वांबद्दल नसून बदलत्या आचारधर्माबद्दलच असतात. संस्कृतिसंगमाच्या काळात दृश्य धर्म झपाट्याने बदलत असतात, धर्मावरचा विश्वास उडालेला असतो, जेत्यांचे अनुकरण होत असते, नवनवे प्रयोग करू पाहण्याची धडपड चालू असते. अशा काळातील प्रमाणशून्यता डोळ्यांना दिसेल इतकी मोठी असते. नव्या जुन्यांचा तीव्र झगडा चालू असतो. आरोप प्रत्यारोप होत स्कर्ट किंवा विजार घालणाऱ्या, पाचवारी लुगडे नेसून पदर अर्ध्या पाठीवर सोडणाऱ्या, कुंकू लावले-न-लावलेले पण पावडर मात्र भरपूर फासणाऱ्या मुली निरागस असणे शक्यच नाही, असे कित्येकांचे ठाम मत असते. तर दुसऱ्या बाजूने जुन्या पिढीचे सर्वच विचार आंबलेले, विटलेले व विकृत मनोवृत्तीचे निदर्शक आहेत अशी खात्री असते. मर्यादा म्हणून काही शब्द असतो; रुचिवैचित्र्य व उच्छृंखलपणा, सौंदर्याची मर्यादशील जोपासना व सौंदर्याचे उघडे प्रदर्शन ह्यांत फरक असतो, हे बऱ्याच वेळा नवी पिढी विचारात घेत नाही. विशेषतः संक्रमणकाळात जेव्हा आचारधर्माच्या बाबतीत कमालीची प्रमाणशून्यता उत्पन्न होते अशा वेळी टिकाऊ सामाजिक मूल्यांबद्दल विचार होणे अत्यावश्यक आहे. तो विचार नव्याजुन्यांनी बसून करावा लागेल, एकमेकांवर चिखलफेक न करता तत्त्व शोधण्याच्या दृष्टीने करावा लागेल.
 "तुम्ही तर म्हणाला होता की, धर्म हा दिक्कालनिरपेक्ष असणे शक्य नाही. मग शाश्वत मूल्ये येणार कुठून?"

।। संस्कृती ।।

८१