पान:Sanskruti1 cropped.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्माण झालेले आहे. काही व्यक्तींचे व्यक्तित्व समाजाशी येणाऱ्या संघर्षांमुळे परिणत होते. सामाजिक नियम बंधनकारक वाटून ते झुगारून देण्याच्या प्रयत्नात अशा व्यक्ती असतात. काही वेळा दैवयोगाने (ज्ञानदेवादी भावंडांच्या बाबतीत) सामाजिक रूढींशी त्यांचा संघर्ष होतो. काही वेळा ते आपण होऊन जुने नियम झुगारून नवे आणू पाहतात. अशा व्यक्ती समाजाच्या रोषाला बळी पडतात किंवा नवयुगाच्या प्रवर्तक होतात. नित्याच्या व्यवहारात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी समाजाच्या नियमांना धाब्यावर बसविणारे लोक असतातच. काहींना गुन्हेगार म्हणून शिक्षा मिळते; काही गुन्हेगार असूनही राजरोसपणे राहू शकतात. समाजात ही जी घडामोड सारखी चाललेली असते, त्यामुळेच समाजाच्या घटनेत व समाजाच्या नियमांत हळूहळू फरक पडत असतो. संघाची जी घडण बनत जाते, ती घडण टिकविण्याचे कार्य आचारविचारांनी होत असते. किंबहुना, एखाद्या समाजाचे सर्व प्रकारचे विधीनिषेध म्हणजेच त्या गुंतागुंतीच्या घडणीचा नकाशा,असे म्हणता येईल.
 प्रत्येक लहान-लहान संघातसुद्धा व्यक्तीव्यक्तीचा व व्यक्ती आणि संघ ह्यांचा संघर्ष चाललेला असतो. या संघर्षामुळे घडण हळूहळू बदलत असते. पण हा संघर्ष उघड नसतो. संघर्ष चालू असताही संघाबद्दलची आत्मीयता बऱ्याच वेळा कायम असते. त्या आत्मीयतेला जेव्हा बाधा येईल असे वर्तन घडते, तेव्हा व्यक्तीला कडक शिक्षा होते. ह्या संघाबाहेर पण संघाशेजारी दुसरे संघ व सनाज असतात. आपल्या संघाबद्दल 'आम्ही'. 'आमचे' असे शब्दप्रयोग होतात, तर दुसऱ्या संघाबद्दल 'तुम्ही', 'तुमचे' 'ते', 'त्यांचे' असे शब्दप्रयोग होतात. 'तू', 'तुम्ही' जास्त जवळचे तर 'ते', 'त्यांचे' जरा दूरचे. ह्या बाहेरच्या. संघांशी वागताना स्वकीय संघातील नियम बरेचसे सैल होतात, तर काही प्रसंगी अजिबात नष्ट होतात. स्वतःच्या संघातला माणूस मारला, तर त्याबद्दल देहान्त शिक्षा होते. परकीय मारला, तर 'उलट सूड तर नाही ना घेणार?' ह्या चिंतेखेरीज 'हातून अकृत्य घडले', असेही स्वजन म्हणत नाहीत. आपल्या संघातल्या दुसऱ्या कोणाच्या बायकोवर डोळा

७८

।। संस्कृती ।।