पान:Sanskruti1 cropped.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. समाजाची मूल्ये ती व्यक्ती आत्मसात करून टाकते; इतकी की, त्या स्वतःच्या अंतःकरणप्रवृत्ती आहेत, असे तिला वाटू लागते. त्या मूल्यांविरूद्ध स्वतःचे आचरण होऊ नये, इतरांचे झाले तर त्यांना दंड करावा, वेळ पडल्यास त्या मूल्यांसाठी प्राण द्यावा, अशी व्यक्तीची भावना होते. ज्या समूहात व्यक्ती वाढते, त्या संघाला उद्देशून ती 'आम्ही' हा शब्द लाविते. त्या 'आम्ही' ची व्याप्ती निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी असते, - आम्ही म्हणजे मी व आई, मी व बायको, सर्व कुटुंब व शेजारी, आम्ही पुणेकर, आम्ही हिंदू, आम्ही ब्राह्मण, आम्ही शिक्षक, अशी निरनिराळी असते. प्रत्येक संघ निरनिराळा, पण परस्परांशी बांधलेला असतो. एका संघातले 'मी' निरनिराळ्या संघांचे घटक असतात. हे निरनिराळे 'आम्ही' व त्यांत मिसळून जाऊन निरनिराळ्या भूमिका वठविणारा 'मी' ह्याच्या संबंधांत जोवर संघर्ष उत्पन्न होत नाही, तोवर साधारणपणे 'मी' ची अस्मिता पुरतेपणी जागृत होत नाही. एखाद्या प्रचंड यंत्राची गती चालू असते. त्यातील लहानातील लहान चाकेही फिरत असतात. त्याच निर्जीव यांत्रिकपणे काही माणसांचे आयुष्य जाते. ती जन्मतात, त्यांना काही विशिष्ट वळण लागते, ती वाढत असतात. आयुष्यात निरनिराळ्या वयात समाजाने अपेक्षिलेली कृत्ये त्यांच्याकडून घडत असतात, जणू निसर्गाचा क्रमच. शेवटी ती मरतात. अशा माणसांच्या जीवनाचे उत्कृष्ट चित्र गडकऱ्यांनी लिहिलेल्या 'मूकनायक' ह्या विडंबनात्मक नाटिकेत दिसते. काही असामान्य व्यक्तित्व असलेली माणसे समाजाने घालून दिलेले नियम संपूर्ण आत्मसात करितात; एवढेच नव्हे, तर इतरांनी त्या नियमांचे पालन करावे म्हणून कोशिस करतात. इतिहासाने वाखाणलेले राजे, स्मृतिकार, स्वतःच्या युगाशी व समाजाशी संपूर्णपणे समरस झालेला कवी हे या प्रकारात येतात. काही गुप्त सम्राट, हर्षवर्धन वगैरे राजे, मन्वादी स्मृतिकार व रघुवंशातील आदर्श राजांच्या रूपाने समाजाची मूल्ये साकार करणारा कालिदास ही अशा व्यक्तींची उदाहरणे होत. ह्या सर्व उदाहरणांतील व्यक्तींचे असामान्य व्यक्तित्व समाजाशी असामान्य एकरूपता पावल्याने

।। संस्कृती ।।

७७