पान:Sanskruti1 cropped.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याला चालता येत नाही. चालणे ही एक लहानपणी शिकण्याची कला आहे. तीच गोष्ट भाषेबद्दलची. मोठेपणी मनुष्य चालतो व बोलतो ते विचार न करता अगदी नैसर्गिक होऊन जाण्याइतके अंगवळणी पडतात. डोक्यावरचा पदर न ढळणे हे मराठमोळ्या स्त्रियांना अगदी नैसर्गिक वाटते. नवऱ्याच्या किंवा बायकोच्या नावाचा उच्चार न करताही त्यांच्याबद्दल जुन्या स्त्रीपुरूषांना सफाईने बोलता येत असे. अशी उदाहरणे असंख्य देता येतील. हे नियम जितके सर्वमान्य, तितके वडील पिढीकडून त्यांचे नव्या पिढीकडे संक्रमण व तिच्याकडून आत्मसात होण्याची क्रिया ही बरीचशी बिनबोभाट होते. समाजातील व्यवहार सुरळीत चालण्यासाठी हे नियम व त्यांना अनुसरून केलेल्या क्रिया ह्या अत्यावश्यक आहेत. नुसता विचार किंवा हेतू कितीही चांगला असला, तरी क्रियेशिवाय त्यांनी समाजाचे कल्याण होणार नाही; आणि कोणती क्रिया कशी करावयाची, ह्याबद्दलचे काही नियम नसले, तर मनुष्याला काहीच क्रिया करिता यायची नाही. प्रत्येक समाज, मग तो. जुन्या परंपरांना चिकटून असो; वा क्रांतीवर आधारलेला नवसमाज असो, त्याला विधीनिषेधपूर्वक नियमांची चौकट ही असावीच लागते. विचाराशिवाय करीत गेलेल्या कृतींना वरती 'जीव नसलेले सांगाडे' म्हटले आहे, तर विधिनियम नसलेल्या समाजाला 'कोठल्याही तऱ्हेचे शरीर नसलेला कृतिशून्य जीव' म्हणावे लागेल. अर्थात आचार नियमांशिवाय किंवा आचार नियमांविषयीच्या विचाराशिवाय मनुष्यसमाजच असत नाही.
 निरनिराळ्या मानवसमाजांचा इतिहास पाहिला, तर आपल्याला प्रचंड उलाढालींचे काही काळ आढळून येतात. वागणुकीच्या सर्व जुन्या नियमांविषयी लोक साशंक होतात; व ते झुगारून देऊ पाहतात; नवे नियम अस्तित्वात आलेले नसतात किंवा सर्वमान्य झालेले नसतात. अशा तऱ्हेच्या अवस्थेला प्रमाणशून्यता (Anomie) म्हणतात. नॉर्म म्हणजे प्रमाण सर्व तऱ्हेच्या व्यवहाराचे नियम हे त्या-त्या वागणुकीचे प्रमाण ही प्रमाणे नाहीतशी झाली, म्हणजे प्रमाणशून्यता उद्भवते. ही प्रमाणशून्यता सर्वसाधारण मनुष्य समाजात काही व्यक्तींच्या बाबतीत काही वागणूकींच्या बाबतीत आढळते;

७४

।। संस्कृती ।।