पान:Sanskruti1 cropped.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भुतांचा वर्तमानकाळात चाललेला हैदोस होय. संप्रदायांच्या जागतिक इतिहासाकडे नजर टाकिली, तर असे दिसून येईल की, कर्मकांड व तत्वचिंतन ह्यांचा झगडा अखंड चालू असतो. काही वेळा तत्त्वचिंतनाला महत्त्व दिले जाते, पण सांप्रदायिकत्व हे बव्हंशी चिंतनाला मारक व कृतीला पोषक असते.
 पण ह्या प्रश्नाला असलेली दुसरी बाजू महत्त्वाची आहे. धर्माच्याद्वारे सामाजिक व्यवहाराचे नियंत्रण होते. व्यवहारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, पण विचारांवर नियंत्रण ठेवणे मोठे कठीण आहे. समाजजीवन हे बव्हंशी कृतीमय असते. व्यक्तीचे परस्परसंबंध, व्यक्तींचे समूहांशी संबंध व समूहांचे परस्परसंबंध ह्यांचे स्वरूप कृतीतच दिसून येते; आणि ते कसे असावे. ह्याबद्दल काही नियम बांधिलेले असतात. नवरा-बायको, आई-बाप व मुले, शिष्य आणि गुरु, मालक आणि नोकर वगैरे असंख्य व्यक्तीव्यक्तींचे संबंध असतात. निरनिराळ्या नात्यांनी जोडलेली कुटुंबे, घरमालक व नगरपालिका, कर देणारे व कर घेणारे यांतील संबंध सामूहिक स्वरूपाचे असतात व त्या बाबतीत परस्पर वर्तणूक कशी असावी, ह्याबद्दल काही ढोबळ नियम असतात. मनुष्य आपल्या आयुष्यात एक प्रकारे निरनिराळ्या भूमिका करीत असतो. ह्या भूमिका कशा पार पाडावयाच्या, ह्याचे जे परंपरागत आदेश, ते सर्व मिळून समाजातील परस्पर-व्यवहाराची एक चौकट बनते. हे नियम सर्वांना माहीत असतात; व त्यांचे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सारखे होत असते. त्यामुळे कोणतीही विशिष्ट भूमिका वठवावयाला दर वेळेला विचार करावा लागत नाही. ह्या नियमाप्रमाणे भूमिका वठविणे हे मनुष्य जवळजवळ नकळत करीत असतो. प्रत्येक व्यवहार करताना 'आता काय बरे करावे?' असा प्रथम विचार करून मग तो करायचा असे म्हटले, तर सामाजिक जीवन अशक्यच होऊन जाईल. शारीरिक व्यवहारांच्या बाबतीत सवयीने व अति अभ्यासाने आत्मसात केलेल्या हालचालींना जे स्थान, तेच स्थान ह्या सामाजिक व्यवहाराबद्दलच्या नियमांना आहे. उदा. मनुष्याचे मूल जर मनुष्यापासून दूर काढले, तर

।। संस्कृती ।।

७३