पान:Sanskruti1 cropped.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असावा, असा कित्येक विचारवंतांचा आग्रह आहे. 'धर्म म्हणजे आधिदैविक कल्पनांवर आधारलेला आचार एवढ्यापुरताच धर्म शब्दाचा अर्थ मर्यादित केला, तर असे दिसून येईल की, जगातील बहुतेक संप्रदाय 'धर्म मनोमय असावा,' असे तोंडाने म्हणत असले, तरी परंपरागत आचारधर्मावर त्यांचा मोठा भर असतो. कित्येक वेळा हा आचारधर्म इतका मांत्रिक यांत्रिक बनतो की, नीती-अनीतीच्या दृष्टीने पाहिल्यास त्यातील सर्व मूल्ये नाहीतशी झाल्यासारखी वाटतात. निसर्गाचे नियम जसे सर्वांना लागू असतात, त्या बाबतीत सर्वसाधारणपणे जसा विचाराचा भाग नसतो, तसे सांप्रदायिक आचाराचे होते. झाडावरून फळ सुटले की ते खाली पडणारच, किंवा स्वेच्छेने वा नकळत आगीशी संबंध आला की अवयव भाजणारच, सांप्रदायिक आचाराचे होऊन जाते. 'अजित नाम वदो भलत्या मिषें। सकळ पातक भस्म करीतसे।' ह्या व्यवहारात केवळ यांत्रिकपणाच राहतो. नामस्मरणाला मोल आहे असे ठरले, म्हणजे जितके अधिक वेळा नाव घ्यावे. तितका मूल्याचा (पुण्याचा) ठेवा अधिक; मग स्मरणीचे मणी ओढले की एक-एक मोजीत बसण्याची यातायात नको. जर पुण्यकारक मंत्र वा नाव एखाद्या चाकावर पुनःपुन्हा लिहिले (१००वेळा, २०० वेळा वगैरे) व ते चाक फिरविले, तर एका फेऱ्यात १०० किंवा २०० नामस्मरणे होतात, व जितक्या वेळा चाक फिरवावे, तितके पट पुण्य पदरी पडते, ही तिबेटी बौद्धांची युक्ती. म्हणजे वर सांगितलेल्या तांत्रिकपणाची परिसीमा झाली.
 सांप्रदायिक व्यवहारात शब्द व कृती ह्यांना विशेष महत्त्व चढते; त्यामागचा 'अर्थ म्हणजेच विचार नाहीसा होऊ लागतो. मंत्रातील एक शब्द जरी चुकला, तरी सर्व क्रिया फुकट जाते; व क्रिया करिताना एक जरी गोष्ट सांगितल्यापेक्षा निराळी झाली, तरी क्रियेचे मोल जाते. असा हा आचारधर्म कालमानाप्रमाणे बदलणे कठीण होते; व कधीकाळी अर्थ असलेल्या सर्व क्रिया अर्थहीन किंवा त्यापेक्षाही भयंकर म्हणजे अनर्थकारक होऊन बसतात. सांप्रदायिकांचे कर्मकांड म्हणजे एके काळी आत्मा असलेली जिवंत संस्कृती; पण आता ती मरून केवळ खटपटींचा व क्रियांचा सांगाडा तेवढा उरलेल्या

७२

।। संस्कृती ।।