पान:Sanskruti1 cropped.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चालतो. देवनागरी लिपी फार शास्त्रशुद्ध आहे, जगातील सर्व भाषांतील उच्चार त्या लिपीत लिहिता येतात, असा पुष्कळांचा दावा आहे परंतु जगातील इतर भाषा तर राहोत, पण भारतात बोलण्यात येणाऱ्या कित्येक भाषांतील उच्चार देवनागरीत लिहिता येत नाहीत. बंगालीतील 'ऑ' हा तमीळमधील दोन 'र' ही दोनच उदाहरणे पुरेत. मायेमुळे माणूस वेडे होते म्हणतात, ते आचारविचारांच्या बाबतीत फार तीव्रतेने दिसून येते. आपल्या समजल्या जाणाऱ्या माणसांचे आचारविचार श्रेष्ठ वाटतात. नैसर्गिक वाटतात, शास्त्रशुद्ध वाटतात; इतरांचे अधम, भयावह वाटतात.
 एखाद्या समाजाच्या आचाराचे नियम म्हणजे धर्म, अशी व्याख्या केली. धर्म बहुतांशी आचारप्रधान असतो. पण स्वतःच्या आचारासंबंधी विचार करणे ही मनुष्याची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. 'अमके निषिद्ध, तमके वैध, असे का?' असा प्रश्न मानवजातीतील सर्व विचारवंत हजारो वर्षे विचारीत आले आहेत. जे करणीय ते 'सत्', जे निषिद्ध ते 'असत्' हे समीकरण नेहमीच पटत नाही. त्याचप्रमाणे आचरणामागे मन असते. 'सत्' व 'असत् हे गुण आचरणाचे की विचाराचे, हाही प्रश्न सर्व विचारवंतांनी चर्चिलेला आहे. जर क्रिया. मग ती सक्रिया का असेना, यंत्राप्रमाणे होत राहिली, तर तिला काही मूल्य आहे का? ज्यांनी उच्चतम धर्माचे विवेचन केले आहे. त्यांना धर्म मनोमय वाटतो.
 'मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।
 मनसा चे पदुद्वेन भासते वा करोति वा ।
 ततो नं दुक्खमन्वेति चक्कं व वहतो पदं ।।
 कृती व विचार ह्यांपैकी प्रथम काय, असा विचार केला तर पहिल्याने कृती, मग विचार, असेच म्हणावे लागेल. काही मानसशास्त्रज्ञ तर असे म्हणतात की, जोपर्यंत कृती काही अंतराय न येता फलापर्यंत जाऊन पोहोचते, तोपर्यंत विचार उद्भवतच नाही. कृतीत अडथळे आले की, प्राणी थांबून विचार करतो. पण ही झाली सर्वसामान्य कृतीची गोष्ट. ज्याला आपण धार्मिक आचार म्हणतो, तो विचारपूर्वक, बुद्धिपुरःसर (मनः पूर्वंगम)

।। संस्कृती ।।

७१