पान:Sanskruti1 cropped.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वडीलधारी माणसे त्याच्याकडून निरनिराळी कृत्ये करून घेत असतात, व त्याला शाबासकी अगर शिक्षा देत असतात. संस्कृतीचे एका पिढीकडून दुसरीकडे संक्रमण होते ते ह्याच मार्गाने. लहानपणी सामाजिक आचार आत्मसात होतात. त्या वेळी त्या आचारांमागे कारणपरंपरा काय आहे हे माहीत नसते, व जाणण्याची शक्ती नसते. भोवतालच्या आचाराविचारांशी समरस होण्याने जीवन सुकर होते; व ते तसे करण्याची वृत्ती लहान मुलांत दिसून येते. लहानपणी आत्मसात केलेल्या आचारविचारांभोवती तीव्र भावनांचे वलय असते. अमके चांगले, तमके वाईट, अमके मंगल, तमके अमंगल, अमके आदरणीय, तमके गर्ह्य, अमके शास्त्रीय, तमके अशास्त्रीय अशी मते ठाम बनलेली असतात. आपले आचारविचार योग्य, इतरांचे तसे नव्हेत; एवढेच वाटून थांबत नाही; तर आपले ते नैसर्गिक इतरांचे ते विकृत, अशीही दृढ भावना होते. रोज स्नान करणे हा आचार स्वच्छतेचाच नव्हे, तर मांगल्याचा निदर्शक आहे, असे आपल्याला वाटते. जगातील कित्येक प्रदेशात पाण्याच्या अभावी किंवा थंडीच्या प्रभावामुळे हा आचार पाळणे शक्यही नसते व इष्टही नसते. तिबेटातील पवित्र व आदरणीय समजले. जाणारे, मांगल्याची मूर्ती असे धर्मगुरु लामा कधी आंघोळ करितात की नाही, परमेश्वरालाच ठाऊक! आपले वेदकालीन पूर्वजही आंघोळीला फार महत्त्व देत असत, असे नाही. लामणदिवा, निरांजन, उदबत्ती ही आपण मांगल्याची प्रतिके समजतो. रॉकेलचा दिवा किंवा विजेचा दिवा आपण मंगलकारक समजत नाही. थोडा विचार केला, तर लक्षात येईल की, रॉकेल किंवा वीज माहिती होण्याआधी पिढ्यानुपिढ्या निरांजन व लामणदिवा देवघरात व मुंजीच्या लग्नाच्या व इतर प्रसंगी आपण लाविलेला पाहिला आहे; येथे बुद्धीपेक्षा भावनेचाच भाग जास्त आहे. देवापुढे तुपाचा दिवा लावायचा, हविर्द्रव्य तूपच असावे, हे आचार वेदकालीन पूर्वजांकडून आलेले आहेत. आजही उत्तरेकडे थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांना वनस्पतिजन्य तेले माहीत नाहीत. सर्व लौकिक व दैनिक व्यवहार प्राण्यांपासून मिळणाऱ्या आज्य (शेळीच्या दुधाचे तूप), धृत व इतर चरबी ह्यांवरच

७०

।। संस्कृती ।।