पान:Sanskruti1 cropped.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नंबुद्री, सारस्वतांखेरीज मराठी ब्राह्मण व गुजराती ब्राह्मण मासे खात नाहीत. मुसलमान व ज्यू लोकांना डुकराच्या शरीरात सैतानाने प्रवेश केला, म्हणून डुकराचे मांस वर्ज्य आहे. तर गाईच्या शरीरात सर्व देव असतात म्हणून हिंदू गाईचे मांस खात नाहीत. तसेच कपड्यांचे आहे. वर सांगितलेले एस्किमो लोक पायाच्या तळव्यांपासून केसांपर्यंत सर्व अंग झाकेल, असे शरीराच्या मापाप्रमाणे बेतून, कापून चामड्याचे कपडे शिवतात; झोपताना सर्व कपडे काढून झोपतात. ही पद्धत परिस्थितिजन्यच नव्हे, तर बुद्धीला पटेल, अशी वाटते. पण बाकी इतर रानटी व पुढारलेल्या लोकांत पोषाख एकाच हवामानात निरनिराळा असतो; व तो निरनिराळ्या असण्याची कारणे बहुधा काही बुद्धीला पटतील अशी, तर काही सर्वस्वी बुद्धीपलीकडची असतात. डोक्याला आवरण असावे का नसावे, कोणत्या प्रसंगी असावे, बायकांनी उघड्या डोक्याने जावे, का केस सूर्याला दिसू नयेत म्हणून त्यावर फडके बांधावे, की पदर घ्यावा, स्तन झाकावे की नाही, कमरेभोवतालचे वस्त्र पायघोळ असावे की गुडघ्यापर्यंतच असावे, वस्त्र कोणत्या वस्तूचे व तंतूंचे असावे, - वगैरे गोष्टी काही बाबतींत परिस्थितीवर अवलंबून असल्या, तरी बहुतांशी बुद्धीला न पटणा-या व परंपरागत कल्पनांवर आधारलेल्या आहेत.
 निरनिराळ्या लोकांचे रीतिरिवाज निरनिराळे असण्याची कारणे काय असावीत, ह्याबद्दल आपण थोडक्यात वर विवेचन केले. प्रत्येक समाज निरनिराळ्या भौतिक परिस्थितीत वाढलेला असतो. प्रत्येकापुढे जीवनाच्या झगड्यात निरनिराळे प्रसंग आलेले असतात. त्या प्रसंगांना तोंड देता देता काही रिवाज निर्माण होतात. त्यांच्याच जोडीला काही विशिष्ट आधिदैविक कल्पनांमुळेही व्यवहाराला वळण लागते. सौंदर्यकल्पना, नव्याची आवड, जेत्यांचे वा पुढाऱ्यांचे अनुकरण वगैरेंमुळे काही नियम आलेले असतात. समाजात रूढ असलेले आचार जो आचरतो तो चांगला, आचरीत नाही तो वाईट, हे ओघानेच आले; त्याचबरोबर आचारांनाही चांगले-वाईटपणा आला. लहान मूल सारखे भोवतालच्या माणसांचे अनुकरण करीत असते; त्याचप्रमाणे

।। संस्कृती ।।

६९