पान:Sanskruti1 cropped.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'आम्ही' म्हणजे व्यक्तींचा लहान-मोठा समूह. ह्या समूहाची मूल्ये, वागणुकीचे नियम निरनिराळ्या तऱ्हेचे असतात. काही अगदी सर्वस्वी वस्तुनिष्ठ व अनुभवजन्य असतात. एखादा वन्य समाज असेल, तर काय खावे, ह्याबद्दलचे नियम बहुतकरून वनात मिळणाऱ्या आहाराबद्दलच्या अनुभवातून जन्माला आलेले असतात; काय ल्यावे, हे काय मिळते त्यावर अवलंबून असते. भोवतालच्या सृष्टीबद्दलचे ज्ञान ह्या नियमांतून वापरलेले दिसते. पण ह्या अनुभवजन्य ज्ञानावर आधारलेल्या निमयांखेरीज इतर असंख्य नियम असे असतात की, त्याला बुद्धी व वास्तवता ह्यांच्या कसोट्याच लागू पडत नाहीत. आधिदैविक व्यवहाराबद्दलचे सर्व नियम व आधिभौतिक व्यवहाराचेही बरेचसे नियम ह्या कोटीतील असतात. जगात फक्त मनुष्य, इतर प्राणी व वनस्पती एवढेच असतात, असे नाही. त्याखेरीज सर्वस्वी अदृश्य, कधी काही प्रसंगीच दृश्य, मनुष्यासारखे किंवा इतर प्राण्यांसारखे उपकारक किंवा दुष्ट अशा निरनिराळ्या योनींतील व्यक्ती माणसांबरोबर राहतात. मंत्रतंत्रांनी त्यांना वश करता येते, त्यांच्यावर हुकमत गाजविता येते, किंवा अशी सृष्टी सर्वस्वी मानवी शक्तीच्या कह्याबाहेर असते, अशा तऱ्हेच्या सृष्टीची कल्पना सर्व मागासलेल्या व प्रगत मानवसमाजात असते. अशा सृष्टीला उद्देशून करावयाच्या व्यवहारात एका दृष्टीने विलक्षण विविधता व एका दृष्टीन आश्चर्यकारक साम्य आढळते. काय खावे, काय ल्यावे हे परिस्थिती ठरविते; पण कसे खावे, कसे ल्यावे, कसे रहावे, वगैरे व्यवहार ह्या आधिदैविक कल्पनांवर आधारलेले असतात. पुष्कळदा काय खावे हे देखील असल्या कल्पनांवर आधारलेले असते. उत्तरध्रुवाभोवतालच्या सदैव बर्फाच्छन्न गोठलेल्या पट्ट्यात राहणारे एस्किमो म्हणून लोक आहेत; पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ते फक्त मांसाहार करीत. कोणत्याही तऱ्हेची शाक त्यांच्या खाण्यात नव्हती; मांसही सर्पणाच्या अभावी कच्चेच खावे लागे. खाण्याचे जिन्नस प्रकार सर्वस्वी परिस्थितिजन्य होते. इतर लोकांच्या बाबतीत मात्र खाणे इतके परिस्थितिजन्य नसते. भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मच्छीमारी चालते; व तेथील बहुतेक लोक मासे खातात. पण आंध्र, तमीळ,

६८

।। संस्कृती ।।