पान:Sanskruti1 cropped.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचारी शहाण्या पुरुषाने घालून दिले, अशी दंतकथा आहे. वन्य जमातींतूनही अशा तऱ्हेचे सर्वांना माहीत असलेले व सर्वमान्य नियम असतात; ते वाडवडिलांपासून परंपरागत आलेले असतात. ते नियम कोणी केले, ह्याबद्दल कधीकधी दंतकथा प्रचलित असतात. ते जरी अलिखित असले, तरी त्यांनाही स्मृती म्हणणेच योग्य होईल.
 श्रुती आणि स्मृती ह्यांच्या द्वारे संकलित केलेल्या नियमांखेरीज इतर हजारो बारीकसारीक नियम असतात. ते लिहिलेले नसतात. त्यांचा कर्ता कोण असतो, ते कोणाला माहीत नसते. पण माणसांनी त्याप्रमाणे वागावे, अशी माणसांची अपेक्षा असते.
 असे वागावे, असे वागू नये, असे नियम बनण्याच्या क्रियेत दोन गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. पहिली म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचे सामाजिक मूल्यमापन व दुसरी म्हणजे जे चांगले ते करायला लावण्याचे सामाजिक सामर्थ्य. ही असल्याशिवाय धर्माचा उगम व विकास होणार नाही व धर्म टिकून राहणार नाही.
 चांगल्या वाईटाचा विवेक किंवा मूल्यांची कल्पना ही एक सामाजिक पसंती किंवा नाराजी व्यक्त करितात. त्या पसंतीचा किंवा नाराजीचा ठसा व्यक्तीच्या मनावर उमटतो व त्यातूनच मूल्यांची कल्पना व्यक्तींच्या मनात पहिल्याने उगवते. 'जे करू नये ते केले,' ही भावना माणसालाच असते असे नव्हे, तर जनावरालासुद्धा असते. कुत्र्यासारख्या हुशार प्राण्याच्या बाबतीत तर ही प्रकिया उत्तम दिसते. अमक्या खुर्चीवर बसलेले धन्याला आवडत नाही, हे कुत्र्याला पक्के माहीत असते. धनी आलाच तर ते झटकन उठते व पळून जाते किंवा अपराधी चेहरा करून, शेपूट हलवून आपला अपराध लपवू पाहते. मुलांच्यावर केलेल्या काही प्रयोगात ही गोष्ट फार उत्तम तऱ्हेने सिद्ध झाली आहे. तीनचार मुली ह्या प्रयोगासाठी निवडल्या होत्या. प्रत्येकीला खेळणी दिली होती. खेळण्यांचे जोड होते. पैकी 'एक जोड आपल्या मैत्रिणीसाठी बाजूला काढून ठेव व दुसऱ्याने खेळ,' असे प्रत्येकीला सांगितले होते; व मुली काय करतात, ते गुप्तपणे पाहण्याची व्यवस्था केली

।। संस्कृती ।।

६५