पान:Sanskruti1 cropped.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आढळते. अशा वाङ्मयात रोजच्या लौकिक व्यवहारात कसे वागावे, ह्याचे नियम फारसे नसतात; पण काही विधी कसे करावे, ह्याबद्दल अगदी बारीकसारीक तपशील असतो; लहानशी पण चूक होऊ नये म्हणून दक्षता घेतलेली असते. अगदी लहानशी चूक, मग ती मंत्राच्या उच्चारात असो, विधीच्या क्रमात असो, वा कोणी कोणते कृत्य कसे करावे ह्याबद्दल असो तिचे परिणाम फार विपरीत होतात, असाही समज सार्वत्रिक दिसून येतो, जगातील निरनिराळ्या श्रौत वाङ्मयांतून आचरणविषयक जे विधिनियम सांगितलेले आहेत, तेही 'धर्म' या नावाखाली येतात.
 मानवधर्मशास्त्र व त्यासारखी इतर धर्मशास्त्रे ह्यांना 'स्मृती' असे नाव दिलेले आहे. 'स्मृती' म्हणजे स्मरलेले. मागच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांना सांगून जे परंपरागत नियम समाजात रूढ झाले, त्या 'स्मृती'. मनू, याज्ञवल्क्य वगैरेंना आपण स्मृतिकार असे म्हणतो. स्मृतिकारांनी आपापल्या पिढीत जे काही नियम रुढ होते त्यांचे संकलन केले, ते नियम एकत्र केले. क्वचित दोन-तीन निरनिराळ्या रूढी दिसून आल्या, तर काही निषिद्ध मानून काहींचा पुरस्कार केला. तर काही वेळा अमक्या प्रदेशात अमकी रूढी आहे. तर अमक्या प्रदेशात अशी आहे.' अशीही नोंद केलेली आढळते. जशा श्रुती सर्व समाजांत आढळतात, तशा 'स्मृती' ही सर्व मानवसमाजांत आढळतात.
 हजारो वर्षांपूर्वी बावेरू (बाबिलॉन) देशात हामुराबी म्हणून एक प्रख्यात राजा होऊन गेला. तो त्या देशाचा पहिला स्मृतिकार अशी बरीच वर्षे अर्वाचीन इतिहासकारांची समजूत होती. प्रत्यक्ष सूर्यदेव कायद्याचे पुस्तक हामुराबीला देत आहे, असे एक चित्र दगडावर कोरलेले आहे. त्यावरून हामुराबीने देवाच्या प्रेरणेने वागणुकीचे नियम केले. अशी कल्पना झाली. आता नवीन नवीन पुरावा हाती मिळाला आहे; व त्यावरून असे सिद्ध झाले आहे की, हामुराबीच्या आधी कित्येक शतके असे नियम अस्तित्वात होते; ते सर्व एकत्र करून हामुराबीने त्यांचे संकलन केले. मनू आपल्याकडील सर्वात पूज्य स्मृतिकार. हासुद्धा आपला पहिला राजा होता, अशी कल्पना आहे. अशाच तऱ्हेचे नियम जुन्या काळच्या ग्रीक लोकांना सोलोन नावाच्या

६४

।। संस्कृती ।।