पान:Sanskruti1 cropped.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवहार कसे असावे, ह्याचेही विवेचन वरील ग्रंथांत आढळते. बौद्धांचे विनयपिटक व जैनांचे ‘आचारांगसूत्र' ('आयरंगसुत्त) ही मुख्य पुस्तके असली, तरी इतरही पुष्कळ पुस्तके ह्याबद्दल लिहिलेली आहेत. आचार कसा असावा ह्याबद्दल फुटकळ कविता संस्कृत, पाली व जैन प्राकृत ह्या भाषांतून इतकी आहे की, तिला गणतीच नाही. अर्वाचीन हिंदी भाषांमधूनही असे वाङ्मय अमाप आहे. गाणी, म्हणी, श्लोक, लोककथा वगैरेंमधून वागावे कसे, चांगली वागणूक कोणती व वाईट कोणती, ह्याबद्दलचे पिढ्यानुपिढ्यांचे साठवून ठेवलेले मत पहावयास व अभ्यासावयास मिळते. जी गोष्ट भारताची तीच इतर देशांची. सर्वच देशांतून अशा तऱ्हेचे लिखित नियम रूढ आहेत; श्रुती आहेत, स्मृतीही आहेत.
 वेद व ब्राह्मण यांतील काही भागाला श्रुती म्हणण्याचा प्रघात आहे. श्रुती म्हणजे दैवताकडून ऐकिलेले किंवा पाहिलेले काहीतरी. मंत्र रचणाऱ्या ऋषीला 'द्रष्टा' म्हणतात. त्याचप्रमाणे यज्ञक्रिया व तीबरोबर म्हणावयाचे मंत्र हेही काही व्यक्तींना दृष्टीगोचर झाले, अशा कथा आहेत. उदा. महिदास ऐतरेयाला अग्निष्टोमयज्ञाची सर्व क्रिया (मंत्रांसकट) दिसली, असे ऐतरेयब्राह्मणात लिहिलेले आढळते. अशा तऱ्हेचे अनुभव बायबल, कुराण वगैरे सांप्रदायिक ग्रंथांत तर आढळतातच; पण ज्यांच्या भाषेत लिपीचा संस्कारही झाला नाही, अशा वन्य समाजांतही आढळतात. लोवीने एका ग्रंथात अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या वायव्य प्रदेशात राहणाऱ्या काही वन्य जाती, दैवतविषयक चालीरिती व अनुभव दिले आहेत. तेथील एका माणसाला एक विशिष्ट विधी (तंबाखूची सांप्रदायिक पेरणी) व तो करीत असतानाची सर्व कृत्ये व गाणी (मंत्र) ह्यांचा दृष्टांत कसा झाला, ह्याची माहिती दिली आहे. ती वाचीत असता महिदास ऐतरेयाच्या कथेची आठवण होते. श्रौत वाङ्मयात निरनिराळे विधी, ते करावयाचा क्रम व त्यावेळी म्हणावयाचे मंत्र ह्यांचाच समावेश विशेष करून असतो. अशा तऱ्हेचे वाङ्मय वन्य व सुसंस्कृत अशा दोन्ही समाजांत फार प्राचीन काळापासून

।। संस्कृती ।।

६३