पान:Sanskruti1 cropped.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 धर्म म्हणजे माणसाने समाजात वागावयाचे नियम. हे नियम लिखित असतील, किंवा अलिखित असतील. त्या नियमांचे कर्तृत्व संत, ऋषी, द्रष्टे किंवा प्रत्यक्ष देव यांकडे सोपविलेले असेल, किंवा परंपरागत वाडवडिलांपासूनची चाल आहे इतपतच असेल; त्या नियमांनुसार न वागणाऱ्याला उपहासापासून राजदंडापर्यंत काहीही शिक्षा असू शकेल. धर्माची अशी व्याख्या केली, म्हणजे जे इतर अनेक अर्थ आहेत. ते निदान ह्या विवेचनापुरते तरी संमत नाहीत, हे स्पष्टच आहे. येथे 'धर्म' हा शब्द इतक्या व्यापक अर्थाने योजिला आहे की, कोणत्याही मानवसमाजात रूढ असलेल्या आचारयंत्रणेला तो लागू पडावा. धर्म हा शब्द हल्ली आपण मराठीत निरनिराळ्या देवदैवतसंप्रदायांसाठी उपयोजितो. उदा. हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, इसाई धर्म वगैरे. संस्कृतात 'धर्म' शब्द ह्या अर्थाने वापरल्याचे लेखिकेला स्मरत नाही. दैवते, मरणोत्तर स्थिती, स्वर्गनरक ह्यांबद्दलच्या कल्पनांना 'धर्म' शब्द लावतात. पण तो ह्या विवेचनात संमत नाही. (अशा कल्पनांना 'संप्रदाय' किंवा 'दर्शन' शब्द योजिला आहे.) ह्या व इतर दर्शनांतून वागण्याचे विधीनिषेधपूर्वक नियमही सांगितलेले आहेत. त्या नियमांना पहिल्या व्याख्येप्रमाणे 'धर्म' हाच शब्द वापरणे बरे. धर्म हा शब्द बऱ्याचदा 'नैसर्गिक प्रवृत्ती' ह्या अर्थानेही वापरतात. उदा. "भुंकणे हा कुत्र्याचा धर्म आहे', प्रयोगात 'प्रकृती' (शैत्यं हि यत् सा प्रकृतिर्जलस्य) किंवा 'स्वभाव' असे शब्द योजिलेले बरे. म्हणजे 'धर्म' हा शब्द फक्त वर दिलेल्या व्याख्येच्या अर्थानेच येथे योजलेला आहे. त्याच अर्थाने 'मानवधर्मशास्त्र' ह्या शब्दप्रयोगातही तो योजिलेला आहे. मनूने शास्त्रीय दृष्ट्या त्या वेळच्या समाजात रूढ असलेल्या सर्व आचारांचे विभाग पाडून निरनिराळ्या समूहांनी व व्यक्तींनी निरनिराळ्या प्रसंगी कसे वागावे ह्याचे जे विवेचन केले आहे, ते 'मानवधर्मशास्त्र'.
 मनूप्रमाणे इतर विचारवंतांनीही धर्मशास्त्रे लिहिली; व त्यांनाच आपण स्मृती म्हणतो. बौद्ध व जैन ग्रंथांतही आचार कसा असावा, ह्याबद्दल विवेचन आहे. मुख्यतः भिक्षू व जैन या दीक्षा घेतलेल्यांचे आचार कसे असावे, ह्यावर जरी मुख्य भर असला, तरी त्याच्या अनुषंगाने समाजातील इतर व्यक्तींचे

६२

।। संस्कृती ।।