पान:Sanskruti1 cropped.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आठ


धर्म


 ‘ऊर्ध्वबाहुविरौम्येष न च कश्चिच्छृणोति माम् ।'
 'बाहू उभे हाकारितो । कोणी ऐकेनाचि मज ||'
 "व्यासांचे तुम्ही घेतलेले वचन उत्कृष्ट आहे; पण..."
 - तुमच्या मनात आलेली शंका मलापण आली होती. खरे म्हणजे मी लबाडी करायला पाहत होते. संस्कृतमध्ये अशा वचनांना तोटा नाही. ऐकिले म्हणजे पहिल्याप्रथम वाटते की, 'वावा, काय छान तत्त्व सांगितले आहे!' पण विचार करायला लागले की, लक्षात येते की, ज्या एका शब्दावर सर्व विचाराची इमारत, त्याच शब्दाचा अर्थ स्पष्ट व संशयातीत नसतो. 'धर्मात् अर्थः च कामः च केवढे मोठे तत्त्व गोविले आहे, असे वाटते. पण मग ध्यानात येते की, ज्या धर्मावर सर्व व्यवहार आधारावयाचा, तो 'धर्म' म्हणजे काय, हे सांगितलेलेच नाही. मला वाटले होते, मी व्यासांचा श्लोक देईन, तुम्ही खूष व्हाल ! अपेक्षेप्रमाणे झालातही खूष; पण तात्पुरत्याच तुमच्याही मनात आले की, धर्म म्हणजे काय हे जोवर स्पष्ट झाले नाही. तोपर्यंत ह्या ओळीचा वाटेल तो अर्थ करिता येईल. निदान लेखिकेला तरी 'धर्म' ह्या शब्दाने काय म्हणायचे आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे.
 'जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेंच करी ।।"
 'धर्म' म्हटला की, 'अधर्म' शब्द मनात येतोच. 'धर्म' ह्या शब्दाने काहीतरी चांगले, आचरणास योग्य असा बोध होतो, तर अधर्म म्हणजे काहीतरी वाईट, जे वर्ज्य करावे, टाळावे असे, असा बोध होतो. चांगले- वाईट, आचरणीय अनाचरणीय, उत्तम अधम ह्या जोड्या जी मूल्ये दाखवितात, त्यांच्या बाहेरचे, ज्याला ही विशेषणे लागू पडणार नाहीत, असे काही आहे काय?

६०

।। संस्कृती ।।