पान:Sanskruti1 cropped.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे त्या बिचाऱ्यांना माहीतच नव्हते. एक दिवस सासू थोरल्या सुनेकडे येऊन म्हणाली, “बाई, संध्याकाळी तुझा दीर येईल त्याचे आतिथ्य कर." नटून- थटून ती पलंगावर पडली होती. मनात विचार चालले होते. "कदाचित भीष्म येईल. तो नाही, तर कुरूंच्या दरबारातील दुसरे कोण बरे येईल? " शेवटी उगवला तो एक भीषण दिसणारा, लाल डोळ्यांचा, पिंगट जटांचा ब्राह्मण. त्याला पाहून बिचाऱ्या अंबिकेने डोळेच मिटले. ह्या अवस्थेत तो तिला भोगून गेला व जो मुलगा झाला तो जन्मांध धृतराष्ट्र. सत्यवतीने व्यासाला नंतर दुसऱ्या सुनेकडे पाठविले. व्यासाचे रूप पाहून ती पांढरीफटक पडली आणि तिला झाला तो मुलगा पांडू.
 परत एकदा व्यासाला सुनांकडे पाठवायचे असा बेत सत्यवतीने केला. सत्यवतीपुढे सुनांना काही बोलता येईना. पण त्यांनी ह्या माणसाबरोबर न निजण्याचा निश्चय केला होता. त्यांनी एका दासीच्या अंगावर राणीची वस्त्रे व अलंकार चढविले व तिला व्यासाच्या दिमतीला ठेवले. दासी व्यासाला भ्याली नाही व शिसारलीही नाही. तिने व्यासाचे आदरातिथ्य केले. ह्या संबंधापासून झालेला मुलगा विदुर. पण कोण्या राणीपासून न झाल्यामुळे राज्याला अधिकारी नव्हता.
 ह्या एका कृत्याने त्या पकडून आणलेल्या परावलंबी बायांनी जे काय होत आहे, त्याबद्दलचा आपला विरोध प्रकट केला. महाभारताचे युद्ध त्यांना झालेल्या, व्यंग असलेल्या मुलांमुळे उद्भवले. महाभारतात सांगितले आहे की, राण्यांना व्यासाचे रूप सोसले असते, तर मुले निरोगी झाली असती. हे खरे घरले तर त्यांनी व्यासाला दर्शविलेल्या विरोधामुळे महाभारत युद्ध झाले, असेही म्हणता येईल. दुसऱ्या वेळी व्यासाचे आदरातिथ्य थोरल्या सुनेकडून झाले असते, तर कदाचित होणारे मूल अव्यंग निपजले असते. म्हणजे महाभारत कथेचा गाभा ज्याप्रमाणे ह्या राण्यांच्या विधवापणी अनिच्छेने केलेल्या पहिल्या संभोगात आहे त्याचप्रमाणे परत अशा तऱ्हेच्या मानहानीला तोंड द्यायचे नाही, ह्या निर्धारातही आहे. ह्याही सत्यवतीप्रमाणे मूकनायिकाच पण त्यांनी एकदा तरी आयुष्यात आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडत असताना

५८

।। संस्कृती ।।