पान:Sanskruti1 cropped.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून देवव्रताने सत्यवतीचे आपला बाप शंतनू त्याच्याशी लग्न लावून दिले. एवढ्या महत्त्वाच्या वाटाघाटीत सत्यवतीने काहीही भाग घेतला नव्हता. सौदा बोलणारा तिचा बाप होता आणि तो मान्य करणारा भीष्म व शंतनू हे होते. “तुला म्हाताऱ्या शंतनूशी लग्न करायचे आहे का ? तुझ्या मुलांना गादी मिळावी, असे वाटते का?" असे तिला कोणीही विचारले नव्हते. तीन पुरूषांनी तिचे काय करायचे ते ठरविले.
 लग्न झाल्यावर तिला दोन मुले झाली. आणि थोड्याच वर्षात तिचा म्हातारा नवराही मेला. दोन मुलांपैकी थोरला एका भांडणात मेला व दुसऱ्याला हस्तिनापूरचे राज्य मिळाले. हा मुलगा विचित्रवीर्य प्रकृतीने नाजूक होता. त्याचे लग्न झाल्यावर तो १-२ वर्षातच क्षयाने निपुत्रिक वारला. बापाने तिच्या लग्नात केलेल्या सर्व सौद्यावर पाणी पडले. "भीष्मा, तू राजा हो, व लग्न कर" असे तिने आपल्या सावत्र मुलाला सांगितले. पण त्याने ते मानले नाही. शेवटी भीष्माच्या संमतीने तिने आपला कुवारपणाचा मुलगा जो व्यास, त्याला बोलाविले व राण्यांच्या ठिकाणी पुत्रोत्पत्ती करविली. थोरल्याला गादी मिळायची, तो जन्मांध होता. म्हणून धाकट्याला गादी मिळाली व पुढील कलहाची बीजे पेरली गेली.
  थोरला नातू धृतराष्ट्र हस्तीनापुरात राहिला. त्याला खूप मुलगे झाले. धाकटा नातू पांडू राजा झाला. त्याला स्वतःला मुले होणे शक्य नव्हते, म्हणून त्याने दुसऱ्याकडून आपल्या राण्यांच्या ठायी पुत्रोत्पत्ती करविली. मुले लहान असताना पांडू मेला. माद्री सती गेली. त्या दोघांची प्रेते, कुंता व मुले ह्यांना बरोबर घेऊन रानातले ऋषी व ब्राह्मण हस्तीनापुरास आले व त्यांनी पांडूची पोरकी मुले व पांडूची बायको कुंती यांना भीष्माच्या स्वाधीन केले. पांडूचे मर्तिक राजाला साजेशा इतमामाने झाले. ह्या दुखवट्या व्यास आपल्या आईकडे आला व त्याने सांगितले की, "बाई ग, पुढचे भविष्य बरे दिसत नाही. भाऊबंदकीत कुळ नष्ट होण्याचा संभव आहे. पुष्कळ पाहिलेस व पुष्कळ भोगलेस. आता राजवाड्यात राहू नकोस. सुनांना घेऊन वनवासात जा." जन्मभर घरचे पुरूष सांगतील, त्याप्रमाणे वागणाऱ्या सत्यवतीने ह्याही वेळेस मुलाचे ऐकले. ती अरण्यात गेली व तेथेच तिचा अंत झाला.

५६

।। संस्कृती ।।