पान:Sanskruti1 cropped.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सत्यवती एका कोळ्याची मुलगी. एका कथेत सांगितले आहे, की ही मुलगी राजाने कोळ्याला पाळायला दिली, ती अतिशय सुस्वरूप होती. कोळीराजाने (पुण्यसंचयार्थ ? ) गंगेवर एक नाव ठेवली होती. त्या नावेतून वाटसरूंना फुकट गंगापार केले जाई. नाव वल्हवायचे काम ह्या पाळलेल्या सुंदर सत्यवतीकडे होते. ह्या पुण्यकर्मात जे व्हायचे तेच झाले. एका ब्राह्मण तपस्व्याची नजर तिच्यावर खिळली. व तिला त्याच्या वासनेला बळी जावे लागले. ह्या प्रकरणी तिने प्रतिकार केला, किंवा त्या ब्राह्मणाने बलात्कार केला, असे वर्णन नाही. कोळ्याची मुलगी, म्हणजे कोळीराजाची मुलगी असली, तरी ती जातीने हीन होती. ब्राह्मण आणि त्यातून तपस्वी - वरच्या दर्जाचा समजला जाई. ब्राह्मणाने काही मागितले, तर त्याला नाही म्हणू नये, असा सर्वत्र समजही होता. कदाचित त्यामुळे कोळी राजाच्या पुण्यसंचयात भरच पडली असेल. ह्या संबंधापासून दोन गोष्टी झाल्या. एक, सत्यवतीला एक मुलगा झाला. तो पितृसावर्णी म्हणून ब्राह्मण झाला. एक अतिशय विद्वान ऋषी म्हणून गणला गेला, आणि हाच महाभारताचे चरित्र-नायक जे पांडव त्यांचा आजा झाला. ब्राह्मणाशी शरीरसंबंध झाल्यामुळे सत्यवतीच्या अंगाला माशाची घाण येत होती. ती नाहीशी होऊन एक प्रकारचा सुगंध प्रका येऊ लागला. ही झाली दुसरी गोष्ट.
 काही वर्षे लोटली. सत्यवती फारच सुरेख दिसायला लागली. तिच्या अंगच्या सुंगधाची किर्तीही पसरली. ह्या सुमाराला ती पुष्कळ वर्षे पत्नीवियोग झालेल्या म्हाताऱ्या शंतनूला दिसली व त्याचे मन तिच्यावर जडले. शंतनूला कुलशीलाची कधीच पर्वा नव्हती. त्याची पहिली बायको गंगा त्याला अशीच नदीकाठी भेटली होती. राजाने सत्यवतीला मागणी घातली, तेव्हा कोळ्याने सौद्याची भाषा केली. राजाला एकदम 'हो' म्हणवेना. तेव्हा युवराजाने स्वतः येऊन आपल्याला प्रतिज्ञेत बांधून घेऊन सौदा पुरा केला. सौद्याला अटी तीन होत्याः (१) सत्यवतीच्या पोटी येणारा मुलगा हस्तीनापुरच्या गादीवर बसावा, (२) युवराज देवव्रताने आपला राज्यावरील हक्क सोडावा व (३) युवराजाने आमरण अविवाहित राहावे. ह्या तिन्ही अटी पाळण्याची प्रतिज्ञा

।। संस्कृती ।।

५५