पान:Sanskruti1 cropped.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 समुद्रांनी वेष्टिलेली नागासिंहासनी स्थित ।
 साक्षातच वसुंधरा देवी प्रकटली तिथे ||
 पतीशी दृष्टी जडल्या सीतेला अंकि घेऊनी ।
 'नको, नको,' म्हणे तों तों ती अंतर्धान पावली ||
 सीतेच्या सबंध आयुष्यात ती भूमिकन्या आहे, ह्या गोष्टीचे तिला कधी स्मरण झाले होते की नाही कोण जाणे ! इतर लोक ती गोष्ट पार विसरून गेले असतील. भूमी म्हणजे सगळ्यांच्या पायाखालची माती. पण ह्या वेळी, ह्या बिकट प्रसंगी तिला आपल्या आईची आठवण झाली ती विश्वंभरा म्हणून. पहिल्या श्लोकात कालिदासाने तिची प्रतिज्ञा व तिने आईला मारलेली हाक दिली आहे. लोकांच्या पायदळी असलेली भूमी किती ऐश्वर्ययुक्त आहे, म्हणजेच पर्यायाने सीतेचे माहेर किती श्रीमंत होते, ह्याचे वर्णन दुसऱ्या श्लोकात नागफणीने उचलून धरलेली, सिंहासनावर बसलेली पृथ्वी कालिदासाने ज्या शब्दात वर्णिली आहे, तो शब्द तिच्या श्रीमंतीचा निर्देशक 'वसुंधरा' आहे. शेवटच्या श्लोकात पृथ्वी, राम व सीता अशा तिघांच्या कृती आहेत. लग्न झाल्या दिवसापासून रामाबद्दलची सीतेची वृत्ती "रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन" अशी होती. ह्या वेळीही तिचे डोळे रामावर खिळलेले होते. तिला तशीच उचलून आईने मांडीवर घेतले. आणि राम 'नको नको' म्हणून ओरडतो आहे, तोच ती नाहीशी झाली. सीतेची प्रतिज्ञा कशा अंतिम स्वरूपाची होती हे रामाच्याही लक्षात आले नसणार, सीता शब्द उच्चारते काय व पाहता-पाहता धरणीच्या पोटात जाते काय, सर्वच अतर्क्य ! राम सिंहासनावरून उठलेला असणार, हात उभारून 'नको, नको, 'ओरडतो आहे व पुढे जाण्यासाठी त्याने एक पाऊल उचलले आहे. असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. सीता नाहीशी झाल्यावर राम काळाठिक्कर पडला असेल. पण त्याहीपेक्षा राहून राहून मनात येते की, ह्या क्षणीतरी रामाला समजले असेल का की, सहस्त्रशीर्ष सहस्त्रजिव्ह अशा लोक नावाच्या विराटपुरुषाला संतुष्ट करणे अशक्य आहे? जो मनुष्य काही ध्येये उराशी बाळगून आयुष्याचा मार्ग चालतो, त्याला लोकानुरंजन हे ध्येय ठेवता येणे

५२

।। संस्कृती ।।