पान:Sanskruti1 cropped.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नंतर सीता जी आपल्याला दिसते ती रावणाच्या अशोकवनात. एका शिंशपा (?) वृक्षाखाली बसलेली. तिचे वर्णन फार करूण आहे. विशेषतः, रावण तिला भेटायला आला असताना एका हाताने आपले ऊर झाकणारी, एका हाताने आपले उदर लपविणारी, सगळे अंग संकोचून घेणारी अशी सीता व तिच्याकडे पाहणारा रावण ह्यांचे चित्र मनात फार वेळ घोळते. शेवटी हनुमानाची भेट झाल्यावर तिने रामाला निर्वाणीचा निरोप पाठविला, 'सुटका करावयाची तर एका महिन्यात कर नाही तर मी मेले' असा.
 रावणाचा युद्धात पराभव झाला, आणि सीतेला अशोकवनातून आणण्यात आले. मी लहानपणी वाचलेल्या रामायणात पुढीलप्रमाणे वर्णन आहे. राम सीतेला म्हणतो,”तुला हरून नेण्यामध्ये रावणाने माझा अपमान केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी मी रावणाला मारले. तुझ्या आशेने नव्हे." सीतेच्या खऱ्या विटंबनेला येथूनच सुरूवात झाली, शत्रूने पळवून नेणे ही गोष्ट क्षत्रिय-स्त्रियांना ऐकून तरी माहितीची होती. पण ज्याच्यावर प्राणापलीकडे प्रेम केले, ज्याच्याशी इमान राखून शत्रूला दोन हात दूर ठेविले, तो नवराच अशा प्रकारची शंका घेतो ह्याहून दुसरे दुःख काय? सीता चितेवर स्वतःला जाळून घेणार, तोच अग्निदेव शांत झाले. त्यांनी तिला हाती धरून ती शुद्ध आहे, असे सर्वांच्या देखत सांगून रामाच्या अधीन केले. हा अग्निशुद्धीचा प्रकार व ही सीतेची विटंबना संशोधित आवृत्तीत नाही म्हणतात. संशोधित आवृत्ती अजून तेथपर्यंत आली नाही. त्याप्रमाणे महाभारतात सांगितलेल्या रामकथेमध्येही हे प्रकरण नाही.
 सर्वजण अयोध्येला परत आले व राम राज्य करू लागला. ह्या वेळेला राम बत्तीस वर्षांचा असावा. सीता तीस वर्षांची असावी. सर्व सुरळीत चालले होते. सीतेला दिवस गेले होते. व तिने परत एकदा वनात जावे, अशी आपली इच्छा व्यक्त केली होती. त्याच दिवशी रामाला त्याच्या गुप्त हेरांकडून असे कळले की, कुणी क्षुद्र प्रजाजन सीता रावणाकडे राहिल्यावरही रामाने तिचा स्वीकार केला म्हणून हेटाळणीने बोलतात. एवढासुद्धा लोकप्रवाद नको, असे वाटणाऱ्या रामाने दुसऱ्या दिवशी सीतेला न कळविता वनात नेऊन सोडले. हे क्रूर कर्म दुर्दैवाने लक्ष्मणालाच करावे लागले.

५०

।। संस्कृती ।।