पान:Sanskruti1 cropped.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्याबरोबर होती. कैकेयीने तेथे स्वतः वल्कले आणून दिली. रामलक्ष्मण आपली रेशमी वस्त्रे फेडून ती वल्कले ल्यांले. पण सीतेला वल्कल कसे नेसायचे ते कळेना. म्हणून ती शरमिंदी होऊन उभी असताना तिचे वल्कल घेऊन रामाने तिला रेशमी साडीवरून नेसविले, असे वर्णन आहे. दुसरा प्रसंग सीतेने नवऱ्याचे व सासूचे मन वळवून वनवासाला जायची परवानगी मिळविली तो. सीतेच्या तोंडचे श्लोक बायकांनी कसे वागावे ह्याबद्दलच्या कित्त्यात घालून फ्रेम करण्यासारखे आहेत.
 वनात आल्यावर तिचे ठिकठिकाणी कौतुकच झाले. एका स्थळावरून दुसऱ्या स्थळाकडे जायला तिला पायी चालावे लागत होते. ह्यापेक्षा जास्ती कष्ट तिला पडले, असे दिसत नाही. राक्षस वगैरे आले की, रामाने त्यांच्याशी लढून त्यांचा नाश करायचा व लक्ष्मणाने सीतेला सांभाळायची. ह्याउलट असे झोपडी बांधणे, पाणी भरून आणणे वगैरे कामेही लक्ष्मण करीत होता, दिसते. ह्या चाकरासारखे वागण्यामुळेच की काय, सीता लक्ष्मणाला दुरुत्तरे बोलू शकली. प्रसंग होता मारीच वधाचा. ह्या मायावी राक्षसाने मरताना 'हा लक्ष्मणा ! हा सीते !' असा घोष केल्यामुळे रामच घायाळ होऊन पडला, असे सीतेला वाटले. रामाचा आक्रोश ऐकून सीतेने लक्ष्मणाला रामाकडे जावयास सांगितले. "रामाच्या केसाला कोणी हात लावणे शक्य नाही; हा प्रकार राक्षसी मायेचाच असणार" असे लक्ष्मणाने सीतेला सांगितले. 'मी ह्या कानांनी रामाचा शब्द ऐकला, ते खोटे कसे असणार ? - म्हणून "तुझा माझ्यावर डोळा आहे, भरताचा हेर म्हणूनच तू आमच्याबरोबर आलेला दिसतोस.” अशा तऱ्हेचे त्याला लागेल असे शब्द सीता बोलली. सबंध जन्मात तेढे आणि दुष्टपणाचे ती बोलली ते एवढेच. आणि त्याचे प्रायश्चितही तिला कितीतरी पट भोगावे लागले. रावणाने तिला हिरावून नेले, अशोकवनात तिचा छळ केला, एवढेच दुःख ह्या उतावीळ बोलण्याने तिला भोगावे लागले असे नाही, तर रामाकडून तिचा त्याग हेसुद्धा ह्या बोलण्याचेच फळ म्हणावे लागेल.

।। संस्कृती ।।

४९