पान:Sanskruti1 cropped.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सीतेच्या लग्नाची कितीतरी गाणी आहेत; काव्ये आहेत. राजे कसे जमले होते, रावणाला धनुष्य न पेलल्यामळे तो कसा पडला, व शेवटी धनुर्भंग करून माळ रामाच्या गळ्यात कशी पडली, ही वर्णने संस्कृत व मराठी कवींनी केली आहेत. पण आताच्या संशोधित आवृत्तीत त्याला काही आधार नाही. जो धनुष्य वाकवील, त्याला मुलगी देण्याचा पण ऐकून पुष्कळ राजे आले व निराश होऊन परत गेले. ह्या निराश झालेल्या सर्व राजांनी मिळून मिथिलेवर स्वारी केली. जनकाचा पराभव व्हावयाचा पण देवांच्या मदतीने तो वाचला अशी हकीकत आहे. विश्वामित्र रामलक्ष्मणांना घेऊन जनकाच्या यज्ञाला आले, तेव्हा ही हकिकत जनकाने त्यांना स्वतः सांगितली, हे विलक्षण धनुष्य आहे तरी काय ते रामाला दाखवावे, असे विश्वामित्रांनी सांगितल्यावरून धनुष्य असलेली लोखंडी पेटी गाड्यावर घालून खूपशा माणसांनी ओढीत आणली, रामाने पेटी उघडली; आतले धनुष्य उचलले; दोरी चढवली; बाण लावला आणि ओढला, एवढ्यात धनुष्य मोडले. पण जनकाचा पण पुरा झाला होता. त्याने सीता रामाला द्यायची ठरवून दशरथाला बोलावण्याचे ठरविले. पण पुरा झाला. एवढीच एक गोष्ट शिल्लक उरते. देशोदेशींचे राजे सभोवर बसले आहेत व मधे धनुष्य ठेवले आहे, असा स्वयंवर मंडपाचा देखावा राहत नाही.
 लग्न झाले, तेव्हा राम जेमतेम सोळा वर्षांचा होता. सीता चौदाची असावी, असे अनसूयेजळ तिनेच केलेल्या वर्णनावरून वाटते. लग्नानंतर दोन वर्षं ती रामाबरोबर स्वतंत्र राजवाड्यात अयोध्येला राहिली. दशरथाच्या जितक्या राण्या, तितके राजवाडे असावे, असे दिसते. कारण अयोध्याकांडात राज्याभिषेकाच्या आदल्या दिवसाचे व नंतरच्या दिवसांची जी वर्णने आहेत, त्यावरून रथात बसून ह्या राजवाड्यातून इकडून तिकडे माणसे गेल्याची वर्णने आहेत. म्हणजे राम आणि सीता ही काहीशा स्वतंत्रपणे आपल्या स्वतःच्या प्रासादात राहत होती, असे दिसते. वनवासात जातानाचे दोन प्रसंग आठवणीत येतात. दशरथाने कैकेयीला काय वचन दिले, हे कळल्यावर राम कैकेयीच्या वाड्यात दशरथाला भेटायला येतो. त्या वेळी सीताही

४८

।। संस्कृती ।।