पान:Sanskruti1 cropped.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेवटचा भाग व सबंध उत्तरकांड संशोधित होत आहे अजून. पण झालेली काण्डे व त्याच्या प्रस्तावना वाचताना लहानपणापासून बाळगलेल्या कल्पना धडाधड कोसळत होत्या. युद्धानंतर लंकेत सीतेने अग्निदिव्य केले, हे प्रकरणच नव्या आवृत्तीत प्रक्षिप्त मागाहून घुसडलेले म्हणून नाही ! सबंध उत्तरकाण्डही प्रक्षिप्तच आहे, असे सर्व विद्वान संशोधक म्हणत आहेत. रामायण वाचले व माझीही उत्तरकाण्डाच्या प्रक्षिप्तपणाबद्दल मनोमन खात्री झाली. रामाने सीतेचा त्याग केला, ही गोष्टच झाली नाही. म्हणजे एक जुने शल्य अगदी कायम नाहीसे झाले. खरोखर मला आनंद व्हावयास पाहिजे होता. पण तसे झाले नाही. त्या शल्याबरोबर स्वप्नही नाहीसे व्हावयाला घातले. सीता हे स्वप्न आणि सीता हे शल्य एकमेकांशी इतकी निगडित आहेत की, एक गेले की दुसरे राहतच नाही. नवऱ्याबरोबर कष्ट व वनवास भोगणाऱ्या बाया आपल्या कथांतून इतक्या आहेत की, सीतेचे त्याबद्दल विशेष कौतुक होण्याचे कारण नाही. सीता आठवते ती रम्य, स्वप्नमय, धुंद वनवासामुळे. पण त्यापेक्षाही तीव्रपणे जाणवते, खुपत राहते, ती तिच्यावरील शेवटच्या प्रसंगाने. तो गेला की उरलेल्या सीतेला मनात टिकून राहायला कारणच राहत नाही. ज्या कवीने सीतेला दिव्य करावयास लाविले, त्याच्या मनात उद्देश होता रामाच्या स्वभावाच्या आणखी एका - त्याच्या मनाने अलौकिक - पैलूचे दर्शन घडवावे हा. पण झाले भलतेच. त्या एका प्रसंगाने रामचरित्रावर नसलेला डाग उत्पन्न झाला आणि विशेष व्यक्तिमत्व नसलेल्या सीतेच्या चरित्राला विलक्षण धार चढली. शेवटच्या प्रसंगाने तिचे चरित्र आद्यन्त लोकविलक्षण झाले.
 सीतेला कोणी जन्माला घातले नाही. तिचा गर्भभार कोणी वाहिला नाही. कोणाला तिच्यापायी डोहाळे झाले नाहीत. यज्ञाची तयारी चालली होती. लोक जमले होते. भुईतून नांगराचा फाळ आला, त्याबरोबर ती वर आली. तिच्या गोऱ्या बाळ अंगाला मातीचे कण चिकटले होते, असे रामायणात वर्णन आहे. तशीच ती गेली. सभा भरली होती; हजारो लोक जमले होते. धरणीने तिला पोटात घेतले. ती गेली, ती आपली झाली नि गेली. एखादे अघटित घडते ना त्याप्रमाणे ती जन्मली नाही नि मेलीही नाही.

।। संस्कृती ।।

४७