Jump to content

पान:Sanskruti1 cropped.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुरुजी मिळाले. उत्तर रामचरित वाचताना आम्ही मान डोलविली किंवा प्रशंसा केली, की त्यांनी म्हणावे, "हे नाटक तुम्हाला आत्ता नाही कळणार. आणखी दोनदा वाचावे लागेल." आम्ही म्हटले, "वाचू की परत," म्हणजे त्यांनी म्हणावे, “तसे नाही. शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला आहे, पण एकाएका श्लोकाचा अर्थ किंवा नाटकाचा अर्थ कळायचा नाही. लग्न झाले, की एकदा हे नाटक वाचा: मग मुलं झाली, म्हणजे परत हे नाटक वाचा. मग तुम्हाला त्याचा अर्थ कळेल."
 माझी पिढी स्त्रियांच्या हक्कांबद्दल फार जागरूक. त्यामुळे सीता त्यागाबद्दल किती वादविवाद माजत! जणू काय ती आमच्यातलीच एक आहे, इतक्या आपुलकीने आम्ही रामावर जळत असू.
 पुढे प्राकृत अभ्यास करताना 'पऊमचरिय' वाचले. त्यात रामाचीच गोष्ट आहे. सीता शेवटी केशलोच करून प्रव्रज्या घेते, असे दाखविले आहे. कशी फजिती झाली रामाची, म्हणून एक क्षणभर वाटले. पण भर सभेत मुठीमुठींनी स्वतःचे केस उपटणाऱ्या सीतेचे चित्र मनाला पटले नाही. सीतेचे अंतःकरणातील चित्र असे आक्रस्ताळेपणाचे नव्हते; असे उद्वेगकारकही नव्हते.
 “बाई माझे लाडके सिताबाई | बाळपणीचे कौतुक वदू काई ।। "
 मी आपले कान टवकारले. अतिशय गोड गळ्याने, शुद्ध, स्पष्ट, रेखीय कोणीतरी म्हणत होते, - मामंजीच ते. गळ्याचे व वाणीचे इतके गुण दुसऱ्या कोणाचे मला माहित नाहीत. मी हातातले काम टाकून त्यांच्या खोलीशी गेले. धाकट्या नातीला पुढ्यात बसवून आजोबा तिला श्लोक शिकवीत होते. अभावितपणे माझ्या तोंडून आपल्याशीच शब्द निघाले - "प्रतनुविरलेः प्रान्तोन्मीलन्मनोहरकुन्तलैः "आजोबा शिकवीत असलेला मराठी श्लोक भवभूतीचे भाषांतर का? कोणी केले? परशुरामपंत गोडबोल्यांचा तर हा श्लोक नसेल? आजोबांनाही आठवेना व मला कळलेच नाही.
आज आयुष्याच्या उतरणीवर रामायणाची संशोधित आवृत्ती हाती आली. सबंध आवृत्ती पुरी व्हायला अजून वर्ष-दोन वर्ष तरी हवीत.युद्धकाण्डाचा

४६

।। संस्कृती ।।