पान:Sanskruti1 cropped.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 डॉ. व्ही. एम. कुलकर्णी ह्यांनी जैन रामायणावरती बडोद्याच्या 'जर्नल ऑफ ओरिएन्टल इन्स्टिट्यूट' मध्ये १९५९-६० मध्ये दोन लेख लिहिले आहेत. जैन महाराष्ट्री भाषेत विमलसूरी नावाच्या कवीने 'पउमचरिय' नावाचे रामचरित्र लिहिले आहे. हा ग्रंथ सुमारे ख्रिस्त - शतक दुसरे या काळात लिहिला असावा, असे दिसते. पण ज्याप्रमाणे कृष्णकथा जैनांच्या पवित्र धार्मिक ग्रंथाचा भाग समजली जाते, त्याप्रमाणे रामचरित्र समजले जात नाही. रामचरित्रावर जैनांनी पुष्कळच वाङ्मय लिहिलेले आहे. १०-१२ कवींनी रामकथा लिहिलेली आहे. ह्या सर्व कथांतून राम, सीता, दशरथ, भरत वगैरे सर्व मंडळी जिनोपासक होती, असे दाखविले आहे. विमलसूरी कथेच्या आरंभी असे सांगतों की ही कथा गुरुपरंपरेने आपल्याला प्राप्त झालेली आहे. माझ्यापुढे गुरुकडून आलेली एक नामावली आहे (नामावलियनिबध्दम् आयरियपरांपरागयं सर्व वोच्छामि पउमचरियंम). अशा तऱ्हेचे नामावलीचे श्लोक व त्या श्लोकात साररूपाने सांगितलेल्या कथा जैन वाङ्मयात आहेत. त्यांना 'उवएसमालाकहा' (उपदेशमालाकथा) असे म्हणतात. अशाच तऱ्हेच्या नामावलीवरून सूरीने आपले रामायण रचिले असे त्याचे म्हणणे आहे. डॉ. कुलकर्ण्याच्या म्हणण्याप्रमाणे विमलसूरीच्या पुढे ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात रचिलेले मूळ वाल्मीकि रामायण होते. त्यांनी वाल्मीकि - रामायणातील व पउमचरियातील साम्यस्थळे दाखविली आहेत. रामकथा, सीताकथा व रावणकथा लोकगीतांच्या रूपाने प्रसृत होत्या व कुशीलव नावाचे गायक त्या कथा रस्तोरस्ती गात असत, असेही दिसते. वाल्मीकीच्या रामायणात व पउमचरियात जी साम्यस्थळे आहेत, ती ह्या मूळच्या लोकागीतामध्येही असतील. काही साम्य नसलेली जी स्थळे आहेत, ती ह्या मूळच्या लोकागीतामध्येही असतील. काही साम्य नसलेली जी स्थळे आहेत, ती जैनधर्माचा प्रसार करण्याच्या पद्धतीने उघडउघड लिहिलेली आहेत. पण काही स्थळे अशी आहेत की, ती वाल्मीकि रामायणाशी जुळत नाहीत; ती का जुळत नाहीत, ह्याचा उलगडा होत नाही.
 ह्या स्थळांपैकी रामाच्या दक्षिणेकडील प्रवासाचे वर्णन हे एक होय. वर्णनात राम प्रयागहून निघाला, तो निरनिराळ्या ऋषींच्या आश्रमांवरून नर्मदेला पोहोचला, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे पयुष्णी म्हणजे पूर्णा-

।। संस्कृती ।।

४३