पान:Sanskruti1 cropped.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पंपा विंध्य पर्वतात आहे, असा उल्लेख बाणाच्या कादंबरीत आहे. कादंबरीतील पोपट "मी विंध्याच्या अरण्यात पंपेशेजारी जन्मलो." असे म्हणतो. पुराणामध्येही किष्किंधा हे स्थान विंध्यातच दशार्ण, भोज, विदिशा वगैरेजवळ आहे, असे म्हटले आहे (भारत-वर्षः करफेल पृ.४८) कलकीपुराणामध्ये सिंहलद्वीप रेवा ऊर्फ नर्मदेच्या जवळपास कोठेतरी आहे, असे दिले आहे. तेथील राजकन्येला नर्मदा नदीवरील वाऱ्याने त्रास होत होता असे दिले आहे. त्याचप्रमाणे सिंहलद्वीपाच्या राजकन्येने वरण्यास आलेल्या बऱ्याच राजपुत्रांना स्त्रीरूप दिले होते. त्या राजपुत्रांनी नर्मदेत स्नान केल्यावर त्यांना पुरूषरूपाची प्राप्ती झाली, असे म्हटले आहे. म्हणजे एके काळी सर्व रामायणकथा नर्मदेच्या उत्तरेस विंध्याच्या परिसरात झाली, असे दिसते.
 श्री. अय्यर व प्रो. मांकड यांच्या मताप्रमाणे लंका कोठे असावी, हे खाली दिले आहे - विंध्य पर्वतात कैमूर व भंडर अशा दोन श्रेणी आहेत. ह्या श्रेणींत वानर सीतेला शोधीत होते. तिच्या आसपास ऋक्षपर्वत, माल्यवान पर्वत असावेत. कैमूर पर्वत सध्या कटांगी नावाच्या गावाजवळ उतरतो व संपतो. येथेच वानरांची व संपातीची भेट झाली असावी. येथून उत्तरेकडे दीड मैलावर कटाव (खिंड) नावाचे एक ठिकाण आहे. श्री. अय्यर म्हणतात की, तेच महेंद्रद्वार असावे. कैर नदी ह्या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. तिच्या प्रवाहामुळेच येथे खिंड निर्माण झाली आहे. ह्या खिंडीतून जायला अतिशय अरुंद रस्ता आहे. ह्याच रस्त्याने रावण सीतेला घेऊन गेला असावा. कटावहून पूर्वेकडे गेल्यावर थोड्याच अंतरावर एक टेकडी आहे. तिलाच हल्ली 'मंढरा' म्हणतात मंढरा हे महेन्द्रक या संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप आहे. कैमूरश्रेणीत कंडव नावाची एक नदी आहे. ह्या नदीला हिरण नावाची दुसरी नदी मिळते. जबलपूरच्या उत्तरेला सुमारे १८ मैलांवर ह्या नद्या इंद्राणा नावाच्या एका खेड्याच्या भोवतालून जातात. इंद्राणाच्या दक्षिणेला हिरण नदीवर सिंधलदीव म्हणून एक खेडे आहे. इंद्राणाच्या आसपास बऱ्याचशा टेकड्या आहेत. इंद्राणाच्या शेजारीच टिकुडी नावाचे एक खेडे आहे. वर दिलेली मंढरा नावांची टेकडी इंद्राणापासून सुमारे ११।। मैल आहे. इंद्राणा सखल भागात वसलेले असल्यामुळे मंढरापासून इंद्राणापर्यन्तचा भाग पावसाळ्यात पाण्याने भरलेला असतो. म्हणजे येथे १०-११ मैलांचा एक जलसंचय होतो.

।। संस्कृती ।।

४१